30 ऑक्टोबर : गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे पाटणा साखळी स्फोटात एक टार्गेट होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी मोदींसाठी 'मछली 5' असा कोडवर्ड दिला होता. ज्या गांधी मैदानात मोदींचा सभा झाली तिथे एकूण 18 बॉम्ब ठेवण्यात आले होते. यापैकी अजूनही तीन बॉम्ब सापडले नाही.
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका वसतीगृहात राहणार्या तरूणाला 10 हजार रुपये देऊन गांधी मैदानात बॉम्ब ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मैदानात जर स्फोट झाला तर त्यामुळे धावपळ होईल आणि त्यात आणखी जास्त लोक मारली जातील असा कट या स्फोटांमागे रचण्यात आला होता.
दरम्यान, या स्फोट प्रकरणी आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. बिहारमधल्या मोतीहारीमधून या संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. आतापर्यंत या बॉम्बस्फोटाप्रकरणी 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. याआधी ताब्यात घेण्यात आलेल्या इम्तियाझची चौकशी करताना या संशयिताची माहिती पोलिसांना मिळाली. जहानबाद आणि महूमध्ये आता छापे टाकण्यात येणार आहेत.
तर इम्तियाझच्या झारखंडमधल्या घरावर बिहार आणि झारखंड पोलिसांनी छापे टाकलेत. हैदर अली अर्थात अब्दुल्ला नावाच्या माणसानं आपली या स्फोटामागचा मास्टरमाईंड इंडियन मुजाहिद्दीनचा नेता तेहसीन अख्तरशी ओळख करून दिली, अशी माहिती इम्तियाझनं दिलीये. दरम्यान, आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत. आपल्या सरकारनं सुरक्षेमध्ये त्रुटी ठेवल्याच्या आरोपाचा नितीशकुमार यांनी फेटाळला आहे.