02 ऑक्टोबर : वादग्रस्त वटहुकूम राहुल गांधींच्या आक्षेपानंतर मागे घेणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय मात्र वटहुकूम जारी होऊनही काँग्रेस आपला निर्णय मागे घेत असल्यामुळे यूपीएच्या घटक पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयावर नाराजी दर्शवलीय. वटहुकुमाच्या निर्णयाबाबत सर्व घटक पक्षांशी विचारविनिमय झाला होता, विरोधकांशीही चर्चा झाली होती, सर्वांनी वटहुकुमाला अनुकूलता दर्शवली होती. एकाकी काँग्रेस आणि भाजपला काय गैर वाटलं हे मला काही कळलं नाही. मी माझी भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडेन. वटहुकुमात काँग्रेसला आक्षेप कशावर आहे हेसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करीन असं पवार म्हणाले.
तसंच आम्ही राहुल गांधींचे अनुयायी नाही तर आम्ही यूपीएचे घटक पक्ष आहोत असं राष्ट्रवादीनं काँग्रेसला सुनावलंय. राष्ट्रवादी काँग्रेस वटहुकुमासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपलं मत मांडेल असं राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी सांगितलंय. तर, वटहुकुमाचा अध्यादेश मागे घेतल्यास पंतप्रधानांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असं मत समाजवादी पक्षानं मत व्यक्त केलं आहे.