02 ऑक्टोबर : वादग्रस्त वटहुकुमाच्या मुद्द्यावर काँग्रेसनं अखेर युवराज राहुल गांधी यांच्या इच्छेपुढे मान झुकवलीय. काँग्रेसच्या कोअर ग्रुपची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात चर्चेनंतर वटहुकूम मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पण यूपीएच्या मित्रपक्षांनाही विश्वासात घ्यायला हवं, अशी सूचना कोअर ग्रुपनं केली. पण यूपीए समन्वय समितीची बैठक होणार की नाही, हे स्पष्ट नाही. त्यापूर्वी आज बुधवारी सकाळी राहुल गांधींनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. पंतप्रधानांचा अवमान करण्याचा आपला हेतू नव्हता, असं राहुल यांनी पंतप्रधानांकडे स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
पण आपण या वटहुकुमाविरोधात असल्याचंही राहुल यांनी स्पष्ट केल्याचं समजतंय. तर पंतप्रधानांनी संध्याकाळी होत असलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत राहुल यांनी मांडलेल्या मतांचा निश्चितपणे विचार केला जाईल, असं आश्वासन दिल्याची माहिती आहे. मात्र हा फक्त राहुल यांच्या इच्छेचा प्रश्न नाहीये. तर संपूर्ण कॅबिनेटने मिळून घेतलेल्या निर्णयाला परत कसं फिरवायचं या पेचात पंतप्रधांन पडलेत. युपीएतल्या घटक पक्षांची नेमकी काय भूमिका आहे याचाही विचार पंतप्रधानांना करावा लागणार आहे.