01 ऑक्टोबर : राहुल गांधी यांनी वटहुकुमाबाबत केलेल्या विधानमुळे मी नाराज नाही. आजपर्यंत आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेत पण अशा घटनांमुळे मी लगेच नाराज होत नाही. वटहुकुमाबाबत राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा करीन. मात्र यासाठी पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार नाही असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं.
गुन्हेगार लोकप्रतिनिधींचा बचाव करणार्या वटहुकुमावर राहुल गांधींनी केलेल्या विधानावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपली भूमिका मांडली. लोकं काय म्हणतात यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही, असं होतं असतं. त्यांच्या मनात काय चाललंय हे मी सांगू शकत नाही. पण लोक अशी का वागतात याचा शोध घेणं गरजेचं आहे. ज्या वटहुकुमावर हा जो गोंधळ निर्माण झालाय यावर केंद्रीय मंत्रिमंडळात दोन वेळा चर्चा झाली आणि मंत्रिमंडळाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
लोकप्रतिनिधींना वाचवणार्या वटहुकुमाला राहुल गांधी यांनी नॉन्सेन्स म्हणत फाडून फेकून द्या असं खळबळजनक वक्तव्य करत पंतप्रधानावर निशाणा साधला होता. राहुल यांच्या विधानामुळे पंतप्रधान नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही राहुल यांची बाजू सारत पंतप्रधानांकडे बोट दाखवण्याचा हेतू नव्हता असा खुलासा केला होता.
पंतप्रधान आज न्युयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांची परिषद आटोपून भारतात परतले यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी आपण इतक्या लवकर नाराज होणार नाही असं स्पष्ट केलं. तसंच पंतप्रधानांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींबद्दल आपली प्रतिक्रिया दिला. मोदींना हरवण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र आलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले. उद्या बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत असून या बैठकीत वटहुकुमावर चर्चा होणार असून वटहुकूम मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.