28 सप्टेंबर : वादग्रस्त वटहुकुमाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी सरकारवरच तोफ डागल्यामुळे पंतप्रधानांची नाचक्की झाल्याचं बोललं जातंय. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू केलाय.
अमेरिकेत असलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना राहुल गांधींनी एक ई-मेल पाठवला आणि पंतप्रधानांबद्दल आपल्याला मोठा आदर असल्याचं सांगितलं. पण वटहुकूम कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर सोनिया गांधींनीही पंतप्रधानांशी संवाद साधला. आणि पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा करण्याचा हेतू नाही, असं कळवलं.
पंतप्रधानांनी एक निवेदन प्रसिद्ध केलंय त्यात ते म्हणतात...
या मुद्द्यावरून काँग्रेस उपाध्यक्षांनी मला लेखी कळवलंय तसंच निवेदनही दिलंय.सरकारनं सध्या याबाबतची सर्व प्रक्रिया थांबवलीये. मी भारतात परतल्यानंतर कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा केली जाईल -पंतप्रधान
दरम्यान, या वटहुकुमावर सही करण्याची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना घाई नसल्याचं दिसतंय. वटहुकुमाबाबत त्यांनी तीन कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आणि घाईत त्यावर सही करणार नसल्याचं सांगितलं. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान अमेरिकेहुन परतल्यानंतर हा वटहुकूमच सरकार मागे घेण्याची शक्यता आहे.