27 सप्टेंबर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राजकीय वादळ उडवून दिलं. दोषी खासदारांच्या निवडणूक लढवण्याच्या वटहुकुमाबाबत राहुल गांधींनी सरकारविरोधातच भूमिका घेतलीय. हा वटहुकूम नॉन्सेन्स आहे आणि त्याला फाडून फेकून दिलं पाहिजे अशा अतिशय कडक शब्दांत राहुलनी सरकारवर तोफ डागली. दिल्लीतल्या प्रेस क्लबमध्ये काँग्रेस नेते अजय माकन यांनी आज पत्रकार परिषद बोलवली होती. पण, या पत्रकार परिषदेत अतिशय नाट्यमय पद्धतीनं राहुल गांधी हजर झाले आणि अतिशय संक्षिप्त असं वक्तव्य करून तिथून निघून गेले. वेळ दुपारी 1 वाजून 5 मिनिटांची...अजय माकन यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली आणि दोषी खासदार आमदारांबाबतच्या वटहुकुमाचं जोरदार समर्थन केलं. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच माकन यांना दीड वाजता एक कॉल आला आणि 1 वाजून 35 मिनिटांनी माकन राहुल गांधींबरोबर पत्रकार परिषदेत परतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे समोर बसलेल्या पत्रकारांमध्ये थोडी चलबिचल सुरू झाली. हे सर्व शांत झाल्यावर 1 वाजून 50 मिनिटांनी राहुल गांधींनी बोलायला सुरुवात केली. आपण इथं का आलो हे त्यांनी सांगितलं. 1 वाजून 55 मिनिटांनी त्यांनी वटहुकुमाबद्दल आपलं मत मांडलं आणि तो फाडून फेकून द्यायला हवा, असं खळबळजनक वक्तव्य केलं. कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर न देता ते 2 वाजून 5 मिनिटांनी तिथून निघून गेले. पण, नंतर पुन्हा परतले. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे पंतप्रधानांचीच नाचक्की झाल्याची प्रतिक्रिया उमटतेय. सध्या अमेरिकेच्या दौर्यावर असलेल्या पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिलीय,काँग्रेस उपाध्यक्षांनी मलाही पत्र लिहून हे सांगितलं होतं. मी (भारतात) परतल्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करून या विषयावर विचार करू असं पंतप्रधान म्हणाले.राहुल गांधींच्या वक्तव्यावरून एवढं राजकीय वादळ उठण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही राहुल यांनी अनेकवेळा अशी वक्तव्यं केलीय.राहुल गांधी आणि वादग्रस्त वक्तव्यंऑगस्ट 2013- गरिबी ही फक्त मनाची अवस्था आहे. त्याचा अर्थ अन्नधान्याची, पैशाची किंवा वस्तुंची कमतरता, असा नसतो.- आत्मविश्वास असेल तर गरिबीवर मात करता येते. नोव्हेंबर 2011- उत्तर प्रदेशात घेतलेल्या एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून वाद झाला होता. उत्तर प्रदेशच्या लोकांनी महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये भीक मागायला जाऊ नये, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं होतं.ऑगस्ट 2011- एका लोकपाल विधेयकामुळे भ्रष्टाचार संपेल या मताशी आपण सहमत नाही, असंही एक वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरूनही वाद झाला होता. एप्रिल 2007- जेव्हा माझं कुटुंब एखादी गोष्ट करायचं ठरवतं तेव्हा करतंच. मग ती स्वातंत्र्य चळवळ असो, पाकिस्तानचं विभाजन असो किंवा भारताला 21व्या शतकातला देश करणं असो. मार्च 2007- गांधी कुटुंब राजकारणात असतं तर बाबरी मशीद पाडू दिली नसतीमहत्त्वाचे सवाल- अशा मूर्खपणाच्या वटहुकुमासाठी जबाबदार कोण?- वटहुकुमाचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडण्यात आला त्यावेळी राहुल गांधींना याची कल्पना नव्हती का?- राहुल गांधी यांच्या नॉनसेन्स या वक्तव्यामुळे पंतप्रधानांची नाचक्की झाली नाही का?- काँग्रेसमध्ये एका कानाचं दुसर्या कानाला कळत नाही म्हणतात, त्याचंच हे उदाहरण आहे का?- राहुल गांधींच्या या बोचर्या वक्तव्यानंतर पंतप्रधानांनी राजीनामा देऊन अमेरिकेतून माघारी येऊ नये का?