16 सप्टेंबर : पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आज मुझफ्फरनगरच्या दौर्यावर आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग हेही त्यांच्या बरोबर आहेत. बास्सी कालान आणि तालविल इथल्या मदतछावणीमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दंगलपीडितांची विचारपूस केली.
यावेळी दंगलग्रस्तांना सर्व प्रकारची मदत पुरवण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं. तसंच दंगलीचं रिपोर्टिंग करताना जीव गमावलेले आयबीएन नेटवर्कचे रिपोर्टर राजेश वर्मा यांच्या घरीही पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी भेट दिली. मुझफ्फरनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीये.
दरम्यान, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दंगलीविषयी प्रतिज्ञापत्र सादर केलंय. दंगल आटोक्यात आणण्यासाठी केलेले उपाय आणि दंगलग्रस्तांसाठी पुरवलेली मदत यांची माहिती या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलीये.
तर दुसरीकडे, मुझफ्फरनगर दंगलींचा मुद्दा आज उत्तर प्रदेशच्या विधानसभेतही उपस्थित झाला. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. 11 वाजता कामकाजाला सुरुवात होताच, बसपा, काँग्रेस, भाजप, राष्ट्रीय लोकदल या विरोधी पक्षांनी दंगलींच्या मुद्द्यावर घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा