दिल्ली गँगरेप प्रकरणाचा शुक्रवारी निकाल

दिल्ली गँगरेप प्रकरणाचा शुक्रवारी निकाल

  • Share this:

Image img_228722_delhigangrapelatest345_240x180.jpg11 सप्टेंबर : संपूर्ण देशाला हादरावून सोडणार्‍या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाचा शिक्षेबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालाय. या प्रकरणातील दोषी आरोपींच्या शिक्षेचा निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवण्यात आलाय. शुक्रवारी दुपारी 2.30 वाजेपर्यंत निकाल लागणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. आज सकाळी 11 वाजेपासून साकेत कोर्टात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद सुरू झाला होता. यावेळी चारही आरोपींनी कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

आरोपींनी पीडित मुलीला कोणतीही दया दाखवली नाही त्यामुळे आरोपींनाही दया दाखवण्याचं कारण नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केल.. तसंच त्यांना सुधारण्याची संधी देण्याचाही प्रश्न नसल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं. तर बचाव पक्षाच्या वकिलांनी फाशीऐवजी जन्मठेपेची मागणी केली. दोषींकडून भावनेच्या भरात गुन्हा घडलाय, हा पूर्वनियोजित कट नव्हता, असा युक्तिवाद त्यांनी केला.

या प्रकरणातील चारही आरोपींना साकेत कोर्टानं दोषी ठरवलंय. कोर्टानं बसचालक मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय यांना बलात्कार आणि हत्या यासोबतच अपहरण, लूटमार, अशा एकूण 13 गुन्ह्यांखाली दोषी ठरवलं. मुलीनं मृत्यूआधी दिलेला जबाब आणि फॉरेन्सिक ग्राह्य धरून कोर्टाने चौघांना दोषी ठरवलं. या आरोपींना गेल्या वर्षी 26 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीमध्ये सहा जणांनी चालत्या बसवर 23 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता.

तिनं प्रतिकार केला असता, त्यांनी तिला अमानुष पद्धतीनं मारहाण करून जखमी केलं होतं. तिच्यावर आधी दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आलं. मात्र प्रकृती आणखी बिघडल्यानंतर तिला सिंगापूरला हलवण्यात आलं. मात्र, 19 दिवस झुंज दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्यामुळे आरोपींना फाशी होते का की जन्मठेप याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

कोर्टात झालेला व्यक्तिवाद

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी कोर्टाचं कामकाज सुरू झालं तेच अतिशय नाट्यमयरित्या..चारही दोषी "आम्ही निर्दोष आहोत" अशा घोषणा देतच कोर्टात आले. पण नंतर युक्तिवादाला सुरुवात केली ती विशेष सरकारी वकील दयानी कृष्णन यांनी.

* या आरोपींना दया दाखवण्याचं काही एक कारण नाही. ती मुलगी जेव्हा यांच्याकडे दया-याचना करत होती, गयावया करत होती तेव्हा यांना माणुसकी सुचली नाही. अशा निष्ठुर लोकांना दया दाखवण्याचं काही एक कारण नाही. हा अत्यंत क्रुरपणे केलेला अत्यंत अपवादात्मक असा गुन्हा आहे. ह्या आरोपींना फाशीच द्यायला हवी.

* यानंतर दोषी ड्रायव्हर मुकेश सिंगचे वकील व्ही. के. आनंद बोलायला उभे राहिले. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आरोपींना फाशीच होणार असं वक्तव्य केलं होतं. पण, त्यामुळे कोर्टाचा अपमान झाल्यानं त्यांच्यावर कारवाईची मागणी आनंद यांनी केली. पण, कोर्टाने त्यांची ही मागणी तात्काळ फेटाळली.

* त्यानंतर पवन गुप्ता ह्या दोषीचे वकील उभे राहिले. पवन अवघ्या 19 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याला माफ करावं. त्याला सुधारण्याची संधी द्यावी. फाशीची कठोर शिक्षा करू नये, असं त्यांनी म्हटलं.

* खटल्यातला तिसरा दोषी अक्षय ठाकूरचे वकील ए. पी. सिंग यांनी जर बाटला हाऊस एन्काउंटर मधल्या आरोपींना जन्मठेप मिळत असेल तर ह्या आरोपींना का नको असा सवाल विचारला.

* शिवाय अक्षयला आई, बायको आणि मूल यांची काळजी घ्यायची आहे. म्हणून फाशी देऊ नये अशी मागणी केली.

* ए. पी. सिंग यांना यावेळी गांधीजींचं एक वचनही आठवलं. "जन्म आणि मृत्यू हे ईश्वराच्या हाती आहे. मृत्यू तो देईल. माणसांनी बनवलेल्या कोर्टांनी घेऊ नये, असं ते म्हणाले."

* त्यानंतर, ड्रायव्हर मुकेशच्या वकीलांनी मुकेशने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला द्या. त्याने जो केला नाही त्याची नको. असं म्हटलं. शिवाय, ज्याने तपासात मदत केली त्याच्याबद्दल पोलिसांनी खरंतर कृतज्ञ असायला हवं होतं. पण, त्यांनी मुकेशलाही सरसकट ह्या गुन्ह्यात अडकवलंय, असा युक्तिवाद केला.

* शिवाय, व्ही. के. आनंद यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. समाजात निर्माण झालेल्या संतापामुळेच असे गंभीर गुन्हे दाखल केले गेलेत, असा आरोप त्यांनी केला.

* अखेर, सरकारी वकील दयानी कृष्णन पुन्हा एकदा उभे राहीले. त्यांनी हा निकाल समाजात एक संदेश देईल म्हणून तो कठोरच असला पाहिजे अशी पुन्हा मागणी केली

तब्बल सव्वा तीन तास चाललेला हा युक्तिवाद ऐकून कोर्टाने अखेर येत्या शुक्रवारी म्हणजेच तेरा सप्टेंबरला दुपारी अडीच वाजता निकाल देण्याचं जाहीर केलं.

First published: September 11, 2013, 2:25 PM IST

ताज्या बातम्या