06 सप्टेंबर : भाजपमध्येपुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावं या मागणीनं उचल खाललीय. संघ परिवारातले मोदी समर्थक त्यासाठी सातत्याने लॉबिंग करत आहेत. याचा भाग म्हणून दिल्लीमधये गेला आठवडाभर अनेक गुप्त बैठका सुरू आहेत. गुरूवारी रात्री सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. पण निवडणुकीच्या आधी असा कुठलाही निर्णय घेऊ नये हे आपलं मत पुन्हा एकदा अडवाणींनी भागवतांना एकवलंय.
तर मोदी समर्थकांनी मात्र पाच राज्यातल्या निवडणुका घोषित होण्याअगोदर निर्णय घ्या असा दबाव संघनेतृत्त्वावर आणलाय. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींच्या नियुक्तीला आपला विरोध नाही हे माध्यमांसाठी स्पष्ट केलंय.
पण हा निर्णय घेऊ नये यासाठी पडद्याआड चाललेल्या लॉबिंगमध्ये ते बिनीचे शिलेदार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मात्र मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत असं म्हटलंय. 8 आणि 9 सप्टेंबर रोजी संघपरिवारातल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होतेय. यामध्ये निर्णय होण्याची अपेक्षा मोदी समर्थकांना आहे.
पर्रिकरांचं घूमजाव
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घूमजाव केलंय. मोदी हे उत्तम प्रशासक असून त्यांना जनतेनं अगोदरच पंतप्रधान म्हणून घोषित केलंय. माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असं सांगत पर्रिकर यांनी माध्यमांवर खापर फोडलं. मनोहर पर्रिकर यांनी दोन महिन्यापूर्वी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. गुजरात दंगल थांबवता आली असती पण तसे होऊ शकले नाही. ही दंगल नरेंद्र मोदींच्या कारर्किदीवर काळा डाग आहे असं खुलासा पर्रिकर यांनी केला होता.
मोदींविरोधी शिवराज सिंह चौहान?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेही मोदीविरोधी असल्याची चर्चा आहे. पण, त्यांनीही आज सावध भूमिका घेतलीय. त्यांनी याबाबत ट्विटरवर काय म्हटलंय, ते पाहूया...
"भाजपमध्ये पक्ष सर्वोच्च आहे. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल पक्षच निर्णय घेईल आणि त्याबाबत घोषणाही करेल. यासंदर्भात अंदाज वर्तवणं टाळावं. मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याला माझा विरोध आहे, अशा बातम्या निराधार आणि दिशाभूल करणार्या आहेत."-शिवराज सिंह चौहान
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा