लखनौ, 22 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण अपना दल हा तिथला भाजपचा मित्रपक्ष एनडीएतून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याचं चित्र आहे. 'अपना दल'च्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी नुकतीच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची भेटही घेतली आहे.
'अपना दल'च्या अनुप्रिया पटेल यांनी प्रियांका गांधी यांच्या भेटीदरम्यान आघाडी करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेसचे पश्चिम युपीचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील उपस्थित होते.
अनुप्रिया पटेल यांच्या पक्षाचं महत्व
अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल या पक्षाने मागील निवडणुकीत भाजपसोबत युती केली होती. तेव्हा भाजपने त्यांना लोकसभेच्या सात जागा सोडल्या होत्या. या पक्षाचे दोन खासदार आहेत. तर पूर्व उत्तर प्रदेशच्या 10 ते 12 जागांवर या पक्षाचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे हा पक्ष एनडीएतून बाहेर पडल्यास या भागात भाजपची डोकेदुखी वाढू शकते.
प्रियांका यांची एंट्री आणि त्यांच्यासमोरील आव्हान:
लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रियांका यांना सक्रिय राजकारणात उतरवून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मास्टर स्ट्रोक खेळला. पण आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढण्यासाठी प्रियांकांचा किती उपयोग होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावे ही मागणी 2014च्या लोकसभा निवडणुकीपासून केली जात होती. आता प्रियांका यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध लढताना त्यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना त्या कशा सामोऱ्या जातात त्यावर काँग्रेसचे यश ठरणार आहे.
VIDEO: आर्ची देतेय 12 वीची परीक्षा; पाहिलं का तुम्ही?