08 एप्रिल : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचं एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं असतानाच विमानात खासदाराने गोंधळ घातल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. तृणमुल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांचा क्रू मेंबर्सशी वाद झाल्याची माहिती आहे. डोला सेन यांच्यामुळे दिल्ली ते कोलकाता या एअर इंडियाच्या विमानाला अर्धा तास उशीर झाला, असा आरोप करण्यात आला आहे.
डोला सेन यांची आई व्हालचेअरवर होती. व्हीलचेअरवरच्या व्यक्तींना आपत्कालीन दरवाजाजवळ बसता येत नाही. डोला सेन आपल्या आईला आपत्कालीन दरवाजापासून दुसरीकडे शिफ्ट करण्यासाठी तयार नसल्याने हा वाद झाला, अशी माहिती आहे.
तिकीट बूक करताना खासदार डोला सेन यांनी व्हीलचेअरविषयी काहीही माहिती दिलेली नव्हती. मात्र प्रवासात व्हीलचेअर होती, असं स्पष्टीकरण एअर इंडियाच्या वतीने देण्यात आलं आहे.