अण्णांनी सात दिवसानंतर सोडलं उपोषण, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

अण्णांनी सात दिवसानंतर सोडलं उपोषण, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

'शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मी जगाचा निरोप घेण्याचं ठरवलं होतं मात्र ग्रामस्थांनी केलेल्या प्रेमामुळे आणि सरकारने दाखवलेल्या पुढाकारामुळे मी उपोषण मागे घेण्याचं ठरवलं आहे.'

  • Share this:

राळेगण 05 फेब्रुवारी :  मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यात झालेल्या प्रदीर्घ सहा तासांच्या बैठकीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. अण्णा हे महाराष्ट्राची  आणि देशाची संपत्ती असून त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आणि अण्णांनी आपलं उपोषण मागे घेतलं. गावातल्या ज्येष्ठ महिला आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाणी पिऊन अण्णांनी उपोषण मागे घेतलं.

अण्णांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस होता.  त्यामुळे उपोषणाची तीव्रता वाढत होती त्यामुळे सरकारने तातडीने पावलं उचलत कृषीमंत्री राधामोहन सिंह यांना राळेगणसिद्धीत पाठवलं. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन चर्चेला उपस्थित होते.

बैठकीत काय झालं?

लोकपाल

हा विषय सर्वोच्च न्यायालयात असून 13 फेब्रुवारीला त्यावर निवड समितीची बैठक आहे. त्याबाबतचं पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णांना देण्यात आलं.  हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास अण्णांना देण्यात आला.

लोकायुक्त

राज्यात लोकायुक्त कायदा करण्याबाबतचा जुना 1971 चा कायदा बदलण्याची मागणी अण्णांनी केली होती. ती मागणी मान्य केली असून सरकार आणि अण्णांचे प्रतिनिधी असलेली ड्राफ्टिंग कमेटी स्थापन करण्यात येणार आहे.

कृषी मूल्य आयोग आणि हमी भाव

कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता असली पाहिजे अशी अण्णांची मागणी होती. त्याबाबत केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. अण्णांच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सोमपाल हे या समितीचे सदस्य असतील. नीती आयोगाचे सदस्यही या समितीत असणार आहेत.

शेतकऱ्यांचं मानधन

यंदाच्या हंगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मानधन देण्याची योजना जाहीर करण्यात आली होती. अतिरिक्त संसाधनं उपलब्ध झाल्यावर त्यात नक्कीच वाढ करू असं आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे.

अण्णा काय म्हणाले?

मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर समाधान झाल्याचं अण्णांनी सांगितलं. सरकारने ठोस आश्वासन दिल्याने मी आपलं आश्वासन मागे घेत असल्याचं अण्णांनी जाहीर केलं आणि त्यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

अण्णा गहिवरले

यावेळी बोलताना अण्णा म्हणाले, "शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मी जगाचा निरोप घेण्याचं ठरवलं होतं मात्र ग्रामस्थांनी केलेल्या प्रेमामुळे आणि सरकारने दाखवलेल्या पुढाकारामुळे मी उपोषण मागे घेण्याचं ठरवलं आहे. देशासाठी अजुन खूपकाही करायचं आहे." अशी भावना व्यक्त करताना अण्णांचा कंठ दाटून आला होता.

गिरीश महाजन

गिरीश महाजन हे गेल्या सात दिवसांपासून उपोषण सोडविण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. ते म्हणाले यावेळी अण्णांचं मन वळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागले.

VIDEO : अण्णांसोबत यशस्वी चर्चा, विलासराव देशमुखांनंतर फडणवीस ठरले दुसरे मुख्यमंत्री!

First published: February 5, 2019, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading