'आम्हाला आमच्या आईकडे जायचंय', चटके देऊन भाऊ-बहिणीचा एक लाखाला सौदा

'आम्हाला आमच्या आईकडे जायचंय', चटके देऊन भाऊ-बहिणीचा एक लाखाला सौदा

आपली सुटका होणार नाही, हे त्या लहानग्यांना समजले होतं. त्याच रात्री या दोघांनी सर्व झोपेत असताना रेल्वे स्थानक गाठले.

  • Share this:

सुरेश जाधव, हैद्राबाद, 9 फेब्रुवारी : लहान मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवते, अशी बतावणी त्यांच्या आईला करत एका महिलेने त्यांचा लाखात सौदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं दोन लहानग्यांना अमानुष मारहाण करत त्यांच्या पाठीवर चटके दिले. तसंच या सख्या भाऊ-बहिणीची एक लाखाला विक्री करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आंध्र प्रदेशात घडली आहे.

आम्हाला घरी परत सोडा, असा हट्ट धरल्यावर त्या महिलेने लहानग्यांना मारहाण करून चटके दिले आहेत. गंभीर जखमी झालेल्या मुलांनी प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला. सध्या या दोन्ही भावंडांवर येथील बीड  जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गुड्डी आणि सुरज (नाव बदलेले) हे दोघे बहिण भाऊ आहेत. गुड्डी आठ वर्षांची तर सुरज दहा वर्षांचा आहे. हे दोघेही मुळचे कडाप्पा (आंध्र प्रदेश) येथील रहिवासी आहेत. ते चौघे जण बहिण भाऊ असून त्यांना वडील नाहीत.

पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या आईच्या ओळखीच्याच एका महिलेने त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवते, असं सांगत लातूर जिल्ह्यातील चाकूरला आणले. येथे दहा दिवस त्यांच्याकडून काम करून घेतले. या दोन्ही मुलांचा सौदा केला जाणार होता. ही माहिती या मुलांना समजली. त्यांनी आईकडे जाण्याचा हट्ट धरला. मात्र त्यांना स्पष्ट नकार देण्यात आला.

सुरज हा मोठा असल्याने पळून जाण्याची तयारी करत होता. ही चुणचुण त्या महिलेला लागली. तिने या दोघांनाही बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर गरम वस्तूचे अंगावर चटके दिले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

आपली सुटका होणार नाही, हे  त्या लहानग्यांना समजले होते. त्याच रात्री या दोघांनी सर्व झोपेत असताना रेल्वे स्थानक गाठले. रेल्वेत बसून ते परळीला आले. येथे रेल्वे पोलिसांना ही माहिती समजली. पोलिसांनी बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांना माहिती देत दोघांना बीडला आणले. सध्या त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.

दोन्ही मुलांना अमानुष मारहाण झालेली आहे. हा प्रकार संशयास्पद असल्याने आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचे बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांनी सांगितलं आहे. या दोन्ही मुलांना गेवराई तालुक्यातील सहारा अनाथालयात दाखल करण्यात आलं.

मुलांनीच वाचला पाढा

गुड्डी व सुरज यांना तेलगूशिवाय एकही भाषा येत नाही. त्यामुळे भाषा समजणारी व्यक्ती बोलवून त्यांची समस्या जाणून घेतली. यावेळी त्यांनी आपला एक लाख रूपयांत सौदा झाला होता, आणि आपल्याला विक्री केली जाणार होते, असे सांगितले. आम्हाला आमच्या आईकडे जायचे आहे, असे म्हणत त्यांनी एकच टाहो फोडला.


VIDEO : पत्ता विचारण्यासाठी आला, गळ्यातील साखळी खेचून पळाला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 11:53 PM IST

ताज्या बातम्या