पाटना, 8 ऑगस्ट : महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर शिंदे गट फुटला आणि राज्यात भाजपला सत्ता मिळू शकली. इथला आनंद साजरा करीत असतानाच भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. बिहारमध्ये पुन्हा एकदा जेडीयू-भाजप युती तुटण्याच्या मार्गावर आहे. 11 ऑगस्टपर्यंत जेडीयू भाजपची साथ सोडू शकतं, असं समोर येत आहे. नितीश कुमार यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली असून भेटीची वेळ मागितल्याची बातमी समोर आली आहे.
संपूर्ण देश भाजपमय करण्याचा प्रयत्न करणारे अमित शहा यांनी मात्र आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. सीएनएन News18 च्या वरिष्ठ राजकीय पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांना फोन केला होता. सरकार वाचवण्यासाठी अमित शहांकडून हा शेवटचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे. JDU कडून आलेल्या माहितीनुसार, सकाळी अमित शहा यांनी फोन केला होता. मात्र अमित शहांच्या कार्यालयातून हे वृत्त नाकारण्यात आलं आहे.
नितीशकुमार नाराज का?
मागच्या एका महिन्यात घडलेल्या घडामोडींवर नजर टाकली तर भाजप आणि नितीश कुमार यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याचं दिसत आहे. महिनाभरात 4 वेळा नितीश कुमार यांनी भाजपपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. नितीश कुमार दोन आठवडे आधी कोरोना पॉझिटिव्ह आले होते, यानंतर 3 ऑगस्टला त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली.
-सगळ्यात आधी 17 जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली तिरंग्याबाबत देशाच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली, पण या बैठकीला नितीश कुमार गेले नाहीत.
- यानंतर 22 जुलैला तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभाच्या भोजनासाठीही नितीश कुमार यांना बोलावण्यात आलं, पण या कार्यक्रमालाही ते गेले नाहीत.
- 25 जुलैला नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण सोहळ्यालाही नितीश कुमार यांना बोलावण्यात आलं, यालाही नितीश कुमार यांनी दांडी मारली.
- 7 ऑगस्ट म्हणजेच आज नितीश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या नीती आयोगाच्या बैठकीला बोलावण्यात आलं, पण ते या बैठकीलाही आले नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Bihar, BJP, Nitish kumar