S M L

Ground Report : अमेठीतून राहुल गांधींचे काय होणार? उद्या मतदान

अमेठी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्याचा निकालावर परिणाम पडू शकतो.

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 08:12 PM IST

Ground Report : अमेठीतून राहुल गांधींचे काय होणार? उद्या मतदान

अमेठी, 27 एप्रिल: देशातील हाय प्रोफाईल मतदारसंघांपैकी एक असलेल्या अमेठीमध्ये यंदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध भाजपच्या स्मृती इराणी यांच्यात लढत होणार आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यावेळी राहुल गांधी यांचा केवळ एक लाख मतांनी विजय झाला होता. तेव्हाच राहुल गांधी यांचा विजय हा भाजपसाठी मोठा राजकीय संकेत ठरला होता. यंदा स्मृती इराणी यांनी अमेठीत जोरदार प्रचार केला आहे. देशाच्या राजकारणात अमेठी हा मतदारसंघ गांधी घराण्यासाठीचा महत्त्वाचा मानला जातो. काय आहे या मतदारसंघाचा इतिहास, गांधी घराणे आणि अमेठी यांचे नाते कधीपासून सुरु झाले. तसेच विरोधकांनी कधी बाजी मारली का? हा इतिहास तितकाच महत्त्वाचा आणि निकालावर परिणाम करणारा आहे.

2014नंतर गेल्या ५ वर्षातील अमेठी

भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांचा 2014मध्ये जरी पराभव झाला असला तरी त्यानंतर त्यांनी मतदारसंघाशी सातत्याने संपर्क ठेवला. पाच वर्षात अमेठीसाठी त्यांनी अनेक योजना आणल्या आणि त्याच येथील योग्य खासदार असल्याचे कृतीतून दाखवून दिले. आता पुन्हा एकदा त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राहुल गांधींच्या विरोधात प्रचार करताना त्या सातत्याने 15 वर्षापासून बेपत्ता असलेले खासदार असा उल्लेख प्रचारसभांमधून करत आहेत.


राहुल यांचा प्रचार

स्मृती इराणी यांच्या प्रमाणे राहुल गांधी यांचा प्रचार केवळ अमेठी पुरता मर्यादित नाही. काँग्रेस अध्यक्ष या नात्याने ते देशभर प्रचार करत आहेत. अर्थात प्रियांका गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांचे लक्ष अमेठीवर देखील आहे.

1967मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघात पहिली निवडणूक झाली. या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विद्याधर वाजपेयी यांनी विजय मिळवला होता. विद्याधर यांनी त्यानंतर 1971ची निवडणूक देखील जिंकली होती. 1977मध्ये जनता पक्षाच्या लाटेत येथून रविंद्र प्रताप सिंह यांनी बाजी मारली होती. 1980च्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा विजय मिळवला. तेव्हा इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी विजय मिळवला होता. संजय गांधी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राजीव गांधी यांनी येथून मोठा विजय संपादन केला होता. तेव्हा राजीव गांधी यांच्या विरुद्ध लोकदलने शरद यादव यांना उमेदवारी दिली होती. पण यादव यांचा दारुण पराभव झाला. 1984मधील अमेठीच्या निवडणुकीची चर्चा देशभरात झाली. कारण 84मध्ये अमेठीमधून गांधी कुटुंबातील दोघांमध्ये लढत झाली होती. राजीव गांधी यांच्या विरुद्ध मनेका गांधी यांनी निवडणूक लढवली होती. या लढतीत मनेका यांचा मोठा पराभव झाला होता.

Loading...

1989च्या निवडणुकीत राजीव गांधी यांनी पुन्हा अमेठीतून विजय मिळवला. त्यानंतर 1991ला देखील राजीव गांधीच जिंकले. त्यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॅप्टन सतीश शर्मा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. 1996च्या निवडणुकीत पुन्हा शर्मा यांनी विजय मिळवला. पण त्यानंतर 1998मध्ये अमेठीमध्ये काँग्रेसला पहिल्यांदा धक्का बसला आणि हा धक्का दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर भाजपने दिला. 98मध्ये भाजपच्या संजय सिंह यांनी काँग्रेसचा पराभव करत ऐतिहासिक असा विजय मिळवला होता. अमेठी मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून येथे काँग्रेसचा दुसऱ्यांदा पराभव झाला होता. पण भाजपने अमेठीत मिळवलेला हा पहिला आणि शेवटचा विजय ठरला. कारण त्यानंतर या मतदारसंघातून पुन्हा गांधी कुटुंबाने विजय मिळवला. 1999च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांनी अमेठीतून विजय मिळवला. त्यानंतर 2004मध्ये राहुल गांधी विजयी झाले.

जेव्हा अमेठीतून संजय गांधींचा पराभव झाला

1977च्या लोकसभा निवडणुकीत संजय गांधी यांचा अमेठीतून पराभव झाला होता. विशेष म्हणजे संजय गांधी यांची ही पहिली निवडणूक होती. पण आणीबाणीमुळे इंदिरा गांधी यांच्या सरकारबद्दल लोकांच्या मनात प्रचंड नाराजी होती. त्याचा फटका संजय गांधी यांना बसला. जनता पक्षाच्या रविंद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधींचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला संजय गांधी यांनी ३ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत सिंह यांचा पराभव करून घेतला.

राजीव गांधी यांनी शरद यादवांचा केला पराभव

खासदार झाल्यानंतर काही महिन्यातच संजय गांधी यांचा मृत्यू झाला. 1981मध्ये अमेठीत पोटनिवडणूक झाली. तोपर्यंत राजीव गांधी यांचा राजकारणात प्रवेश झाला होता. त्यांनी राजकीय प्रवेशासाठी अमेठीची निवड केली होती. राजीव गांधींच्या विरुद्ध चौधरी चरण सिंह यांच्या पक्षाचे उमेदवार शरद यादव होते. चरण सिंह पंतप्रधान राहिले होते आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. पण राजीव गांधींच्या पुढे शरद यादव यांचा प्रभाव दिसला नाही. राजीव गांधी यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

1984ची ऐतिहासिक निवडणूक

गांधी कुटुंबासाठीचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या अमेठीमधून गांधी घरातील दोन व्यक्ती निवडणूक लढवत आहेत, असे आज कोणाला सांगितले तर त्यावर कदाचित विश्वास बसणार नाही. पण 1984च्या निवडणुकीत गांधी कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकाविरुद्ध लढले. एका बाजूला राजीव गांधी तर दुसऱ्या बाजूला मनेका गांधी अशी ही लढत झाली होती. पण या लढतीत मनेका गांधी यांची अनामत रक्कम जप्त झाली. राजीव गांधी यांना 3 लाख 65 हजार 041 मते मिळाली हे प्रमाण एकूण मतांच्या 83.67 टक्के इतके होते. मनेका गांधी यांना केवळ 50 हजार 163 मते मिळाली.

सोनिया गांधींची राजकारणातील एन्ट्री

राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवले होते. पण जेव्हा राजकारणात येण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी त्याच मतदारसंघाची निवड केली जेथून राजीव गांधी विजयी व्हायचे. 1999मध्ये सोनिया गांधी यांनी पहिली निवडणूक लढवली आणि त्यात त्यांनी दणदणीत विजय देखील मिळवला. सोनिया गांधी यांनी संजय सिंह यांचा जवळ जवळ 3 लाख मतांनी पराभव केला.

असा आहे मतदार

अमेठी लोकसभा मतदारसंघात तिलोई, सलोन, जगदीशपूर, गौरीगंज आणि अमेठी अशा विधानसभेचे 5 मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. अमेठी लोकसभेचा विचार केल्यास मुस्लिम मतदारांची संख्या 4 लाखाच्या आसपास आहे तर साडे तीन लाख मते दलित समाजाची आहेत. याशिवाय यादव, राजपूत आणि ब्राह्मण मतदारांची संख्या मोठी आहे.


VIDEO : भाजपला निवडून द्या, असं म्हणत गडकरी बाजूला झाले आणि आली भोवळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2019 10:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close