मुंबई,01 नोव्हेंबर : आयुष्याच्या नव्या टप्प्याची सुरुवात करताना चांगल्या गोष्टींचा विचार केला जातो. विशेषतः लग्नासाठी ठिकाण ठरवताना ते चांगलंच असेल, हे पाहिलं जातं. लग्नासारख्या पवित्र नात्यात मृत्यू किंवा त्याच्याशी निगडित काहीही असावं असं कोणत्याही दाम्पत्याला वाटणार नाही; मात्र अमेरिकेतल्या एका जोडप्यानं चक्क स्मशानातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही, तर कुटुंबीयांना राजी करून त्यांनी पोषाखही वेगळे वापरले होते. कॅलिफोर्नियात रीडलीमध्ये राहणाऱ्या नोर्मा हिने एक्सेल या तरुणाशी चक्क स्मशानात लग्न केलं आहे. नोर्मा 27 वर्षांची आहे, तर एक्सेल 29 वर्षांचा आहे. त्या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं, तेव्हा अशा प्रकारच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता असं नोर्मानं सांगितलं; मात्र लग्न झालं तेव्हा आपल्याला एका वेगळ्या प्रकारच्या लग्नाचा अनुभव मिळाला व त्याची मजाही घेतल्याचं सर्वांनी सांगितलं.
नोर्मा आणि एक्सेल 2018मध्ये पहिल्यांदा टिंडर या डेटिंग अॅपवर भेटले होते. दोन वर्षं डेटिंग केल्यावर एक्सेलनं नोर्माला लग्नासाठी विचारलं होतं. आता ऑक्टोबर 2022मध्ये दोघांनी लग्न केलं. सुरुवातीला दोघांनी योजमाईट राष्ट्रीय उद्यानात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र नोर्माने दुसरा प्लॅनही केला होता. सुरुवातीला एक्सेल लग्नाच्या या ठिकाणाबद्दल राजी नव्हता, असं नोर्मा सांगते; मात्र काही महिने आधी अखेर तो स्मशानात लग्न करण्यासाठी तयार झाला झाला. हा निर्णय योग्य असल्याचं त्यानं लग्नादिवशी मान्य केलं असंही ती म्हणाली.
हेही वाचा - उड्डाण करतानाच इंडिगो विमानाच्या इंजिनला आग, दिल्ली विमानतळावरील Shocking Video
लग्नासाठी नोर्मा शववाहिकेमधून आली. अनेक ताबूत असलेल्या ठिकाणी त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. लग्नासाठी सामान्यपणे पांढरा ड्रेस घालण्याची पद्धत परदेशात आहे; मात्र नोर्मानं काळा ड्रेस घातला होता. या लग्नसोहळ्याकडे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं, पण ताबूत बनवण्याचं काम करणाऱ्या नोर्माला मात्र हा लग्नसोहळा एकदम ‘परफेक्ट’ वाटला.
नोर्माला स्मशानातच लग्न करायचं होतं. स्त्रियांनी चालवलेलं हे शहरातलं पहिलं स्मशान आहे. तिथे अनेक वर्षं काम केल्यामुळे ते स्मशान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याचं तिला वाटतं. हॅलोविन खूप आवडत असल्यानं आपल्या लग्नासाठी हॅलोविन थीम एकदम योग्य असल्याचं तिला वाटतं. तिनं लग्नाला आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना 1930च्या दशकातल्या स्टाइलनुसार पेहराव करण्यास सांगितलं होतं.
डेस्टिनेशन वेडिंग ही संकल्पना अलीकडच्या काळात उदयाला आली आहे. जहाजात, विमानात, जंगलात अशा अनेक विचित्र ठिकाणी लग्नसोहळे पार पडतात; मात्र स्मशानात लग्न करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रकार असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wedding, Wedding couple, Wedding video