वॉशिंग्टन, 08 ऑक्टोबर : डोनाल्ड ट्रम्प आता कोरोनातून हळूहळू बरे होत आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी कोरोनाची लागण झाल्यानंतर ट्रम्प चीनवर खूप संतापल्याचं पाहायला मिळालं. ड्रॅगनची आता खैर नाही याची मोठी किंमत चुकवावी लागेल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे.
ट्रम्प यांनी ट्वीट करून एक व्हिडीओ संदेश जारी केला. कोरोना झाल्यानंतर जे उपचार मला मिळाले ते इथल्या जनतेला मी मोफत उपलब्ध करून देण्याबाबत सध्या योजना सुरू आहे. कोरोनाचे उपचार घेण्यासाठी आता अमेरिकेतील नागरिकांना आता पैसे मोजावे लागणार नाहीत असा संदेश ट्रम्प यांनी दिला आहे. जे झालं त्यात आपली नाही तर चीनची चूक आहे आणि याची मोठी किंमत त्याला मोजावी लागणार आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
हे वाचा-काय म्हणताय! कोरोनाव्हायरसपासून घोडा वाचवणार माणसांचा जीव; ट्रायलसाठी मंजुरी
रुग्णालयातून व्हाइट हाऊसमध्ये आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा व्हिडीओ जारी केला आहे. चीनच्या वुहानमधून कोरोना पसरला हे चीन मान्य करण्यासाठी तयार नाही आणि चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं सर्वच देश चीनवर नाराज आहेत.
अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच दरम्यान ट्रम्प यांना त्यांच्या खासगी सल्लागाराकडून कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यांच्या प्रचारसभा रद्द झाल्या. सध्या ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नीवर व्हाइट हाऊसमध्ये उपचार सुरू आहेत. 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.