जलपैगुडी (पश्चिम बंगाल), 6 जानेवारी : अडचणीच्या किंवा कठीण प्रसंगी प्रत्येकाला मदत मिळणं गरजेचं असतं. परंतु, काही वेळा असं घडत नाही. कठीण प्रसंगात मदत न मिळाल्याने काही जणांना अधिक समस्यांचा सामना करण्याशिवाय पर्याय राहत नाही. पश्चिम बंगालमधल्या एका मजुराच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला. कठीण प्रसंगी जवळ पुरेसे पैसे नसल्याने आणि रुग्णवाहिकाचालकाने जास्त पैशांची मागणी करून अडवणूक केल्याने या मजुराला त्याच्या आईचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत खांद्यावरून न्यावा लागला.
ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी या घटनेची चौकशी करून अडवणूक करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
रुग्णवाहिकेचा चालक जास्त पैसे मागत असल्याने एका मजुराला त्याच्या आईचा मृतदेह खांद्यावरून न्यावा लागला. जलपैगुडी इथे गुरुवारी (5 जानेवारी) ही धक्कादायक घटना घडली. या घटनेला रुग्णवाहिका चालक आणि शववाहिनी चालक जबाबदार असल्याचा आरोप आहे. मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बिस्वजित महतो यांनी दिले आहेत.
लक्ष्मीराणी दिवाण नावाची एक महिला आजारी होती. तिला जलपैगुडी इथल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. गुरुवारी लक्ष्मीराणी यांचं निधन झालं. स्थानिक ड्रायव्हरने मृतदेह नेण्यासाठी तिच्या मुलाकडे तीन हजार रुपयांची मागणी केली. रिक्षाचालकांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. यामुळे रोजंदारी करणारा हा तरुण आपल्या आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालत निघाला. या वेळी त्याच्या वडिलांनीही मृतदेहाला खांदा दिला. जलपैगुडीपासून क्रांती सुमारे 50 किलोमीटर आहे. सकाळी सात वाजता मृतदेह घेऊन जातानाचं हे भीषण चित्र पाहून अनेक जणांना धक्का बसला.
हेही वाचा - बॉयफ्रेंडचं लग्न झालं तरी भेटण्यासाठी दबाव टाकत होती गर्लफ्रेंड, सिराजने उचललं भयानक पाऊल
त्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचवला आणि अंत्यसंस्कार केले. ही घटना वाऱ्यासारखी पसरताच प्रशासनात खळबळ उडाली. या घटनेमुळे प्रशासनालादेखील धक्का बसला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहनचालकांना माणुसकीने वागण्याचा सल्ला दिला आहे. पोलीस आणि प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून जलपैगुडी जिल्हा पोलिसांनी जलपैगुडी सदर वाहतूक कार्यालयात खासगी वाहनचालकांसाठी जनजागृती शिबिराचे आयोजन केलं होतं. `वाहनचालकांनी लोकांशी मानवतेच्या दृष्टिकोनातून वागावं,` असं आवाहन या वेळी जलपैगुडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप सेन यांनी केलं.
`आम्हाला पोलिसांनी अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनांचं आम्ही पालन करू. तसंच आज रात्री आम्ही एक बैठक घेऊ आणि नवीन दरपत्रक तयार करू,` अशी माहिती शववाहिका चालक संघाचे सचिव दिलीप दास यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Death, West bengal