अलवर, 18 मे : सामुहिक बलात्काराचं प्रकरण ताजं असताना अलवरमध्ये आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. लोकांनी गँगरेप प्रकरणातील आरोपीला ठेचून मारल्याची घटना अलवरमध्ये घडली आहे. लग्नसोहळ्यादरम्यान एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर संतापलेल्या जमावानं एकाचा जीव जाईपर्यंत मारहाण केली. 14 मे रोजी ही घटना घडली आहे. पोलिसांनी मृत आरोपीचं पोस्टमॉर्टेम केलं असून उर्वरित दोघांना ताब्यात घेतलं आहे. तर, दुसरीकडे मृत आरोपीच्या नातेवाईकांची पीडित अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर, मुलीच्या नातेवाईकांनी गँगरेपचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी देखील अलवरमध्ये सामुहिक बलात्कार करत व्हिडीओ तयार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. मागील आठ दिवसातील सामुहिक बलात्काराची ही दुसरी घटना आहे.
काय आहे प्रकरण
अलवरमधील हरसौरा भागात लग्नाचा सोहळा होता. यामध्ये पीडितेसह तीन आरोपी देखील सहभागी झाले होते. त्यानंतर संधी साधत तिघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यावेळी पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर सर्व प्रकरण समोर आलं. यावेळी तिघंही घटनास्थळावरून पसार झाले. पण, पाठलाग करत एकाला पकडण्यात स्थानिकांना यश आलं. यावेळी केलेल्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झाला. 15 मे रोजी भूपसेडा गावात एक मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्याच घेतला. पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर सारं प्रकरण समोर आलं. यानंतर पोलिसांनी उर्वरित दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
VIDEO: भारतीय हवाई दल प्रमुखांकडून मिग 21 विमानाचं यशस्वी उड्डाण