पत्रकार छत्रपती हत्या प्रकरण : 16 वर्षांच्या लढ्याला यश, गुरमीत राम रहीम दोषी

पत्रकार छत्रपती हत्या प्रकरण : 16 वर्षांच्या लढ्याला यश, गुरमीत राम रहीम दोषी

पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणाचा आज 16 वर्षानंतर निकाल आला

  • Share this:

11 जानेवारी : पत्रकार छत्रपती हत्याकांड प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. गुरमीत राम रहीम याच्यासोबत इतर चार आरोपींनाही दोषी ठरवण्यात आले आहे. पंचकुला सीबीआय न्यायालय या प्रकरणी 17 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे.

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमने किशन लाल, निर्मल आणि कुलदीप याच्यासोबत कट रचल्याचं कोर्टात सिद्ध झालं आहे. दुचाकीवर आलेल्या कुलदीपने गोळी झाडून रामचंद्र छत्रपती यांची हत्या केली होती. या हत्येच्या वेळी निर्मल हा सुद्धासोबत होता. छत्रपती यांनी आपल्या सांय दैनिक 'पूरा सच' मध्ये डेऱ्यात सेविकेवर कशाप्रकार अत्याचार कऱण्यात आली, याला वाचा फोडली होती.

या प्रकरणी 2003 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर 2006 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. दोन सेविकांवर अत्याचार प्रकरणी गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या तो रोहतक येथील सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

मुख्य आरोपी गुरमीत राम रहीमला व्हिडिओ कॉन्फ्रन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंजाब आणि हरियाणासह काही भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

16 वर्षांच्या लढ्याला यश

पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणाचा आज 16 वर्षानंतर निकाल आला. 2002 पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. छत्रपती यांच्या कुटुंबाने 16 वर्षांपासून लढा दिला अखेर त्यांच्या या लढ्याला यश आले आहे. रामचंद्र यांचा मुलगा अंशुल छत्रपतीने राम रहीमला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

2002 मध्ये काही अज्ञात महिलांनी राम रहीमच्या डेऱ्यात लैंगिक शोषण होत असल्याचं पत्रक प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर रामचंद्र छत्रपती यांनी या प्रकाराचा माग काढत राम रहीमचा खराचेहरा लोकांसमोर आणला होता. रामचंद्र यांचं 'पूरा सच' नावाचं सांय दैनिक होतं. या दैनिकात त्यांनी या अज्ञात महिलांचं पत्रच प्रसिद्ध केलं. या बातमीमध्ये दोन साध्वींवर बलात्कार आणि मारहाण केल्याचा उल्लेख केला होता.

'पूरा सच'मुळे एकच खळबळ

राम रहीमचा या परिसरात एवढा दबदबा होता की, त्याच्याविरोधात कुणी बोलण्यास पुढे येतं नव्हतं. पण, पहिल्यांदाच एका दैनिकात त्याच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड झाला. 'पूरा सच' दैनिकात हे पत्र छापल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सर्वत्र रामचंद्र यांच्या निडर पत्रकारितेचं कौतुक होऊ लागलं होतं. त्यांच्या या भूमिकेनंतर डेऱ्यातल्या काही साध्वींनी आतली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती.

पत्र छापल्यामुळे हल्ला

या घटनेनंतर 24 आॅक्टोबर 2002 ला रामचंद्र यांच्यावर जीवेघेणा हल्ला झाला. त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी 5 गोळ्या झाडल्या होत्या. जवळपास त्यांनी महिनाभर मृत्यूशी झुंज दिली. पण 21 नोव्हेंबर 2002 मध्ये रामचंद्र यांचा दिल्लीतील अपोलो हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. राजकीय दबावामुळे रामचंद्र यांचा जबाबही नोंदवण्यात आला नव्हता. एवढंच नाहीतर पोलिसांनी एफआयआरमध्ये राम रहीमच्या नावाचा उल्लेखही केला नव्हता. त्यांचा मुलगा अंशुल छत्रपती हा त्यावेळी 21 वर्षांचा होता. त्यांनी आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी प्रत्येक ठिकाणी मागणी केली. पण कुणीही साथ दिली नाही. अखेर त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली.

सीबीआयकडे तपास

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे साध्वींनी पत्र लिहून न्याय मागितला होता. त्यानंतर हे प्रकरण आणखी प्रकाशझोतात आलं. एक वर्षांनंतर डिसेंबर 2003 मध्ये या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयचे तपास अधिकारी सतीश डागर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. डागर यांनी पीडित साध्वींचा शोध घेतला आणि त्यांना जबाब देण्यास तयार केलं. साध्वींनी दिलेल्या जबाबानंतर राम रहीमच्या विरोधात प्रकरणाला खरे वळण मिळाले होते.

=========================

First published: January 11, 2019, 6:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading