Home /News /national /

वधूने खासदाराकडे मागितली अजब मुँहदिखाई; नेत्याचा एक महिन्यात आश्वासन पूर्ण करण्याचा शब्द

वधूने खासदाराकडे मागितली अजब मुँहदिखाई; नेत्याचा एक महिन्यात आश्वासन पूर्ण करण्याचा शब्द

उत्तर प्रदेशातल्या अलिगढ जिल्ह्यातल्या एका नववधूनं एक वेगळीच भेट मुँहदिखाई मागितली. तिही कोणा ऐऱ्यागैऱ्याकडून नाही, तर चक्क खासदारांकडून!

    अलीगढ, 14 मे : नवीन लग्न झाल्यावर वधू-वर आपल्याच विश्वात असतात. आजूबाजूच्या समाजाचा त्यांना विसर पडलेला असतो, असं सर्वसामान्य चित्र आपल्यासमोर उभं राहतं. पण त्याला छेद देणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडली आहे. केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, कुटुंबाच नव्हे, तर संपूर्ण गावाचा विचार एका नववधूनं केला. इतकंच नाही तर त्यासाठी खासदारांना गळ घातली. नवीन लग्न झालेल्या वधूच्या मुँहदिखाईची एक प्रथा उत्तरेतल्या राज्यांमध्ये आहे. या प्रथेचा एक भाग म्हणजे नववधूला प्रथमच पाहण्यासाठी आलेल्या समोरच्या व्यक्तीला काही रक्कम, भेटवस्तू असं बक्षीस वधूला द्यावं लागतं. उत्तर प्रदेशातल्या अलिगढ जिल्ह्यातल्या एका नववधूनं मात्र एक वेगळीच भेट मुँहदिखाईच्या बदल्यात मागितली. तिही कोणा ऐऱ्यागैऱ्याकडून नाही, तर चक्क खासदारांकडून! उत्तर प्रदेशच्या अलिगढ जिल्ह्याच्या खैर गावात राहणारे शेतकरी नवीन कुमार शर्मा यांचा मुलगा दीपांशु शर्मा याचं लग्न हाथरस तालुक्यातल्या बमनई गावातल्या प्रियांका नावाच्या मुलीशी झालं. या लग्नासाठी नवीन कुमार शर्मा यांनी त्यांचे स्नेही असलेले खासदार सतीश गौतम (MP Satish Gautam) यांना बोलावलं होतं. काही कारणानं लग्नासाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते वधू-वरांना आशीर्वाद द्यायला गेले असता तिथे एक वेगळाच प्रकार घडला. मुँहदिखाईच्या प्रथेनुसार खासदार गौतम यांनी वधूच्या हातात भेट म्हणून एक पाकीट दिलं; मात्र वधूनं ते नाकारलं. त्या बदल्यात आपल्या सासरच्या गावात चांगला रस्ता बांधून द्या (Road Development) अशी मागणी तिनं केली. सतीश गौतम हे भाजपचे उत्तर प्रदेशच्या अलीगढ (Aligarh District) जिल्ह्यातले खासदार आहेत. त्यांनीही वधूला एका महिन्यात रस्त्याचं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं. अशा प्रकारे रस्ता बांधून देण्याची मुँहदिखाई आजवर कोणी घेतली नसेल. नववधू प्रियांका हिने तिच्या सासरच्या गावातल्या मंदिराचा रस्ता व्यवस्थित बांधून देण्याची मागणी खासदारांना केली आहे. खासदार सतीश गौतम यांनीही ग्रामस्थांसोबत या रस्त्याची पाहणी केली व एक महिन्याच्या आत नवा रस्ता तयार करण्याचं काम सुरू होईल, असं आश्वासन तिला दिलं आहे. समाज बदलतो आहे. त्यामुळे आपल्या चालीरीतीही त्या पद्धतीनं बदलल्या पाहिजेत, विचारही बदलले पाहिजेत. समाजाला फायद्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल, हे उत्तर प्रदेशातल्या या घटनेवरून लक्षात येतं. अशाप्रकारे आपल्या गावाला मदत करण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकानं केला पाहिजे. तरच समाज आणि पर्यायानं देश पुढे जाईल.
    First published:

    पुढील बातम्या