अंबाला, 20 सप्टेंबर : केंद्र सरकारने राज्यसभेत शेती विधेयक (Farm Bills 2020) मंजूर केले आहे. त्याचे पडसाद आता देशभरात उमटत आहे. काँग्रेस (Congress)ने मोदी सरकार (Modi Government) च्या तीव्र आंदोलन पुकारले आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये जोरदार आंदोलन सुरू झाले आहे.
अंबाला येथील सदोपूर बॉर्डरवर यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा फवारा मारला.
शेतकरी विधेयकावरून हरियाणामध्ये 16-17 शेतकरी संघटनांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
#WATCH Haryana: Police use water cannon to disperse Youth Congress workers protesting over #FarmBills, at Sadopur border in Ambala. pic.twitter.com/1OfFJlcKFo
— ANI (@ANI) September 20, 2020
सदोपूर बॉर्डरवर भारतीय किसान यूनियनने जोरदार विरोधात आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी लावलेले बॅरिकेटिंग तोडून कार्यकर्ते पुढे आले होते. त्यामुळे त्यांच्यावर पाण्याचा मारा करावा लागला, असं अंबालाचे एसपी अभिषेक जोरवाल यांनी सांगितले.
दरम्यान, वादग्रस्त ठरलेले शेती विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. एकीकडे विरोधकांनी जोरदार विरोध केला तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप सरकारने विधेयक मंजूर करणारच रेटा लावून धरला. अखेर राज्यसभेत मोठ्या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक आणि शेतकरी (सशक्तिकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन आणि कृषि सेवा विधेयक सादर केले. या दोन्ही विधेयकांवर मतदान घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी केले शेतकऱ्यांचे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विधेयक मंजूर झाल्याबद्दल कृषीमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.भारताच्या कृषी इतिहासात आज एक महत्त्वाचा दिवस आहे. संसदेत दोन्ही विधेयक मंजूर झाले असून शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. या विधेयकामुळे कृषी क्षेत्रात मोठे बदल तर होईल, पण कोट्यवधी शेतकरी हे सशक्त होईल. गेली अनेक वर्ष शेतकरी हे अनेक बंधनांमुळे अडकून पडले होते. आता या विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत मिळेल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.