पुणेकरांसाठी खुशखबर...दुपारी झोप घेतल्याने निर्णय क्षमता वाढते, नासाचं संशोधन!

पुणेकरांसाठी खुशखबर...दुपारी झोप घेतल्याने निर्णय क्षमता वाढते, नासाचं संशोधन!

'नासा'ने केलेल्या एका संशोधनावरून पुणेकरांच्या बुद्धिमत्तेचं रहस्य आता उलगडलं आहे.

  • Share this:

पुणे 06 फेब्रुवारी : पुणेकरांसाठी जेवण झाल्यानंतर दुपारची झोप हा खास जिव्हाळ्याचा विषय. पुणे आता मुंबईसारखच वेगवान झालं असलं तरी दुपारच्या झोपेवरून पुणेकरांची कायम टिंगल केली जाते. पण 'नासा'ने केलेल्या एका संशोधनावरून पुणेकरांच्या बुद्धिमत्तेचं रहस्य आता उलगडलं आहे. दुपारी थोडीशी झोप घेतल्याने माणसाची निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता वाढते असं 'नासा'च्या संशोधनात आढळून आलं आहे.

'नासा'ने पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या मदतीने हा अभ्यास केला आहे. अंतराळात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना झोपेचा कसा फायदा होतो यावर आणि एकूणच माणसांच्या झोपे विषयी हा अभ्यास करण्यात आला. रात्रीची गाढ झोप आणि दिवसातलं एखादी 'डुलकी' यावर 10 दिवस प्रयोगशाळेत अभ्यास करण्यात आला.

असा झाला प्रयोग

91 जणांची एक टीम 10 दिवस प्रयोगशाळेत राहायला आली होती. या 91 जणांना विभागून झोपेच्या विविध 18 वेळा देण्यात आल्या होत्या. दहा दिवस संशोधन करून शास्त्रज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत. रात्रीची 6-8 तासांची गाढ झोप झाल्यावरही दुपारी 1 ते 3 दरम्यान एखादी 'डुलकी' घेतल्यास जास्त ताजं तवाणं वाटतं. मेंदुला तरतरी येते असं आढळून आलंय.

त्यामुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेत 50 टक्क्यांची वाढ तर कार्यक्षमतेत 35 टक्के वाढ होते असं शास्त्रज्ञांना आढळून आलंय. जो गट दुपारी थोडीशी झोप घेत होता त्या गटाचं काम इतर गटांपेक्षा जास्त चांगलं होत असल्याचं त्यांना आढळून आलंय. काही कॉर्पोरेट कंपन्यांनीही आता कर्मचाऱ्यांना दुपारी 'डुलकी' घेण्याची मुभाही दिली आहे.

'नासा'च्या या संशोधनावर सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा होत आहे. याचा संबंध लगेच पुणेकरांशीही जोडण्यात आलाय. आपल्या बुद्धिचातुर्यासाठी पुण्यातली माणसं विख्यात आहेत. त्याच्या अनेक अख्यायीका कथा,कादंबरी, कविता आणि भाषणांमधून गेल्या अनेक पिढ्यांपासून ऐकायला येतात. याच झोपेमुळे पुणेकर सर्वांमध्ये उजवे आहेत का? असा प्रश्न विचारण्यात येतोय.

दुपारची झोप हेच पुणेकरांच्या बुद्धिचातुर्याचं रहस्य आहे का? असा प्रश्नही नेटकऱ्यांनी विचारला आहे. त्यामुळे तुमची निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता वाढवायची असले तर दुपारची झोप चुकवू नका.

 

 

First published: February 7, 2019, 8:01 AM IST

ताज्या बातम्या