इम्रान खान यांचा नरेंद्र मोदींना फोन, म्हणाले पाकिस्तानला शांतता पाहिजे

इम्रान खान यांचा नरेंद्र मोदींना फोन, म्हणाले पाकिस्तानला शांतता पाहिजे

इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून अभिनंदन केलं आणि शांततेचा प्रस्ताव ठेवला.

  • Share this:

नवी दिल्ली 26 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार असल्याने पाकिस्तानची आता भाषाच बदलली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आक्रमक असणाऱ्या पाकिस्तानने आता नरमाईचा सूर लावलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून शुभेच्छा दिल्यात. पाकिस्तानला भारतासोबत शांतता हवी आहे. पाकिस्तान सर्व विषयांवर चर्चेसाठी तयार असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी सांगितलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविषयी अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवाद बंद केल्याशीवाय पाकिस्तानसोबत चर्चा करणार नसल्याचं भारताने जाहीर केलंय. त्यामुळे दोन्ही देशांमधली चर्चा सध्या थांबलेले आहे. उरी, पठाणकोट आणि पुलवामातल्या हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले करत पाकिस्तानला दणका दिला होता.

भारतात मोदी पंतप्रधान झाले तरच दोन्ही देशात शांतता निर्माण होऊ शकते असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानची भाषा बदलली आहे. नवीन सरकारचा शपथविधी झाल्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली पाकिस्तनविषयीची नेमकी भूमिका स्पष्ट करणार आहेत.

मोदी-इम्रान खान भेट होणार

पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीमध्ये नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांची खूप चर्चा झाली. आता दुसऱ्या इनिंगमध्येही पुन्हा एकदा या दौऱ्यांचा सिलसिला सुरू होणार आहे.

मागच्या वेळी पंतप्रधान बनल्यानंतर मोदींनी पहिला भूतानचा दौरा केला होता. आता मोदींचा पहिला परदेश दौरा कोणता असेल याबदद्ल माहिती कळलेली नाही पण 13 जूनला ते किरगिझस्तानला जाणार आहेत. सुषमा स्वराज यांनी नुकताच किरगिझस्तानचा दौरा केला आहे.

इम्रान खान यांच्याशी चर्चा

मोदींच्या किरगिझस्तानच्या दौऱ्यात ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत भाग घेतील. ही बैठक 13 जूनला सुरू होणार आहे. याच बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेणार आहेत.

याआधी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांची भेट घेतली होती. त्यावेळी हे दोन्ही नेते औपचारिकरित्या भेटले पण दोघांची फारशी चर्चा झाली नाही.

शी जिनपिंग यांचीही भेट

किरगिझस्तानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इम्रान खान यांच्याशी चर्चा होईल, अशी माहिती आहे. याआधी इम्रान खान यांनी निवडणूक निकालानंतर ट्विटरवरून नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं होतं.

याच दौऱ्यात नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतील.

28 जून ला जपानला जाणार

किरगिझस्तानच्या दौऱ्यानंतर मोदी G-20 परिषदेत भाग घेण्यासाठी जपानमधल्या ओसाकाला जाणार आहेत. हे सगळे दौरे नक्की असले तरी मोदींचा पहिला परदेश दौरा अजून ठरलेला नाही. मोदी कोणत्यातरी शेजारी देशाचाच दौरा पहिल्यांदा करतील, अशी शक्यता आहे. याआधी पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत नरेंद्र मोदींनी 59 देशांचा दौरा केला होता.

First published: May 26, 2019, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading