नवी दिल्ली 3 मार्च : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्याने पाकिस्तान हादरुन गेलाय. त्याचबरोबर पाकिस्तानात दडून बसलेला भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमलाही घाम फुटला आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून दाऊद प्रचंड घाबरल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
भारतातू पळून गेल्यानंतर दाऊद पाकिस्तानात लपून बसलाय. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ही दाऊदला पूर्ण संरक्षण पुरवत असते. तो कराचितल्या सैन्याधीकारी राहत असलेल्या भागात राहतो. हा अतिशय पॉश भाग असून लष्करी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय त्या भागात राहात असल्याने तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे.
मात्र भारताच्या हवाई हल्ल्यानंतर त्याला आपल्या जीवाची भीती वाटतेय. ISI दाऊदचा ठिकाणाही बदलवू शकते अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात राहून दाऊद आपला व्यवसाय चालवतो आणि गुन्हेगारी टोळीवर नियंत्रणही ठेवत असतो. आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये दाऊदचा व्यवसाय पसरलेला आहे.
मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर तो भारतातून दुबई आणि नंतर पाकिस्तानात पळून गेला होता. त्यानंतर तो आपल्या हस्तकांमार्फेत सर्व गोष्टी करत असतो. भारताची RAW ही गुप्तचर संस्था दाऊदच्या मागावर असून त्याला अमेरिकेनेही आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून घोषीत केलं आहे. RAW सह IB ही गुप्तचर संस्थाही दाऊदच्या मागावर आहे. त्यामुळे पाकिस्तानने दाऊदची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.