Home /News /national /

लेकीसाठी विधवा आई 30 वर्षे 'बाबा' म्हणून वावरत राहिली; कारण वाचून डोळ्यात पाणी येईल! 

लेकीसाठी विधवा आई 30 वर्षे 'बाबा' म्हणून वावरत राहिली; कारण वाचून डोळ्यात पाणी येईल! 

भारतातल्या पुरुषप्रधान संस्कृतीचे अनेक दाखले इतिहासात आहेत. अजूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. स्त्रियांचं वर्चस्व, त्यांचे अधिकार, हक्क याबाबत समाज म्हणावा तितका पुढारलेला नाही.

    चेन्नई, 16 मे : भारतातल्या पुरुषप्रधान संस्कृतीचे अनेक दाखले इतिहासात आहेत. अजूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. स्त्रियांचं वर्चस्व, त्यांचे अधिकार, हक्क याबाबत समाज म्हणावा तितका पुढारलेला नाही. स्त्रियांवरचे वाढते अत्याचार, हिंसा, घरगुती समस्या हे याचंच द्योतक म्हणायला हवं. त्यात एकटी बाई असेल, तर कौटुंबिक पातळीपासून समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत त्या बाईकडे वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं. अशा समाजात ताठ मानेनं पाय रोवून उभं राहायचं असेल, तर अंगात हिंमत लागते. अशीच हिंमत तमिळनाडूतल्या (TamilNadu) एका महिलेनं 30 वर्षांपूर्वी दाखवली; मात्र त्यासाठी तिनं एक वेगळाच मार्ग निवडला. नवऱ्याचं निधन झाल्यानंतर समाजात वेगळी वागणूक मिळू नये, यासाठी तिनं पुरुष म्हणून जगण्याचा निर्णय घेतला. तमिळनाडूतली पेटचियाम्मल ही 57 वर्षीय महिला अशा प्रकारे वेश आणि नाव बदलून तब्बल 30 वर्षं पुरुष म्हणून वावरते आहे. तमिळनाडूच्या कट्टुनायकपट्टी (Kattunayakanpatti) या गावात राहणाऱ्या एस. पेटचियाम्मल (S. Petchiammal) या महिलेचं वयाच्या विसाव्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांत तिच्या नवऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ती राहत असलेल्या गावात पितृसत्ताक कार्यपद्धतीचा पगडा असल्यामुळे मुलीच्या संगोपनासाठी तिनं पुरुष म्हणून जगण्याचा निर्णय घेतला. स्त्रियांनी घराबाहेर पडून काम करणं तिथल्या समाजाला मान्य होण्यासारखं नसल्यानं पेटचियाम्मल यांनी असा निर्णय घेतला. नवऱ्याच्या निधनानंतर पेटचियाम्मल समाजात मुथ्थू या नावानं कशा वावरू लागल्या, याबद्दल त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. त्या काम करत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी आणि चहाच्या टपरीवर त्यांना महिला म्हणून काम करताना कसा त्रास झाला, याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी तिरुचेंदूर मुरुगन मंदिरात जाऊन केश कापून घेतले आणि शर्ट व लुंगी असा स्वतःचा पेहरावही बदलला. “केवळ माझे जवळचे कुटुंबीय आणि मुलीलाच मी स्त्री असल्याबाबत माहिती आहे. आम्ही कट्टुनायकपट्टी या गावात जवळपास 20 वर्षांपूर्वी पुन्हा आलो. इथे मी पेंटर, चहा मास्तर, परोठा मास्तर ते रोजंदारीवरचं काम अशी सगळ्या प्रकारची कामं केली.” असं त्यांनी सांगितलं. मुलीच्या भविष्यासाठी त्यांनी या कामांमधून मिळालेला पैशाची बचत केली. आधार कार्ड, बँक खातं, मतदार ओळखपत्र अशा सर्व सरकारी कागदपत्रांवरही तशीच ओळख ठेवली आहे. आता त्यांच्या मुलीचं लग्न झालं आहे; मात्र अजूनही मुथ्थू (Muthu) त्यांची ही ओळख पुसायला तयार नाहीत. मुथ्थू झाल्यामुळे आपल्या मुलीला चांगलं भविष्य मिळालं, त्यामुळे मरेपर्यंत हीच ओळख कायम ठेवणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. भारतातच नाही, अनेक देशांमध्ये स्त्रियांना त्यांच्या शिक्षणासाठी, हक्कांसाठी लढावं लागत आहे. अफगाणिस्तानातल्या (Afganistan) नादिया घुलम (Nadia Gulam) यांचीही अशीच कथा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झालेल्या घुलम यांनी दहा वर्षं मुलगा असल्याची बतावणी करून तालिबान्यांना फसवलं. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर तिथल्या मुलींना शिक्षण नाकारलं गेलं. त्यामुळं घराची जबाबदारी पेलण्यासाठी नादिया यांना मुलगा बनून राहावं लागलं. समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्याची उदाहरणं बरीच आहेत. त्यामुळे स्त्रियांनाही स्वतःच्या हक्कांसाठी निरनिराळ्या पद्धतीनं लढावं लागलं आहे. पेटचियाम्मल यादेखील त्यांची लढाई लढल्या, मात्र थोड्या वेगळ्या प्रकारे.
    First published:

    Tags: Mother, Tamilnadu

    पुढील बातम्या