विषारी 'प्रसाद' खाल्ल्याने 10 जणांचा मृत्यू; 80 जणांची प्रकृती गंभीर

विषारी 'प्रसाद' खाल्ल्याने 10 जणांचा मृत्यू; 80 जणांची प्रकृती गंभीर

दक्षिण कर्नाटकातील म्हैसूरजवळच्या चामराजनगर जिल्ह्यात सुलवाडी गावामध्ये विषबाधा होऊन 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

कर्नाटक, 13 डिसेंबर : दक्षिण कर्नाटकातील म्हैसूरजवळच्या चामराजनगर जिल्ह्यात सुलवाडी गावामध्ये विषबाधा होऊन 10 जणांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमाच्या प्रसादातून ही विषबाधा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुलवाडी गावामध्ये महारम्मा देवीचा उत्सव होता. या उत्सवात देवस्थान समितीकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच प्रसादातून विषबाधा झाल्यानं 10 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

देवीच्या महाप्रसाद लाभ घेतल्यानंतर भाविकांना अचानकपणे उलट्या आणि त्रास जाणवू लागला. त्यानंतर भाविकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल 80 लोकांना हा प्रसाद खाल्ल्यामुळे त्रास झाला. या सगळ्या जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मात्र, उपचारादरम्यान 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 80 जणांपैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. कर्नाटक राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेत गावामध्ये 5 वैद्यकीय पथक पाठवण्याचा आदेश देण्यात आले आहे.

ही घटना दुर्दैवी असून चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिली आहे. तर प्रसादही तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये मृत्यूचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published: December 14, 2018, 9:27 PM IST

ताज्या बातम्या