Explainer : कोरोनानंतर मोदींचा पहिलाच परदेश दौरा; पश्चिम बंगालच्या मतदानावर परिणाम होणार?

Explainer : कोरोनानंतर मोदींचा पहिलाच परदेश दौरा; पश्चिम बंगालच्या मतदानावर परिणाम होणार?

काय आहे बांग्लादेश दौऱ्याचं बंगाल कनेक्शन?

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : कोविड-19 ची साथ (Covid-19 Pandemic) पसरल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) शुक्रवारी 26 मार्चला बांगलादेशच्या (Bangladesh) दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना(PM Shaikh Hasina)यांची भेट घेऊन आर्थिक सहकार्य, पाणी व्यवस्थापन, संरक्षण, रेल्वे सेवा, स्टार्ट अप आणि सीमा रेषेवरील नियंत्रण अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. बांगलादेशचा 50 वा स्वातंत्र्यदिन आणि बांगलादेशाचे संस्थापक वंग बंधू शेख मुजीबूर रहमान(Shaikh Mujibur Rehman)यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. बांगलादेशबरोबर व्यापार आणि संपर्क क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भारताचा भर असून,या दौऱ्यात त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील अनेक सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याशी आंतरराष्ट्रीय संबधांसह पश्चिम बंगालमधील निवडणुकीचाही संदर्भ जोडला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये(West Bengal)होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात बांगलादेशमधील अशा काही ठिकाणांच्या भेटीचा समावेश आहे,ज्यांच्याशी पश्चिम बंगालमधील नागरिकांचं भावनिक नातं आहे. विशेषतः मतुआ समाजाचं(Matua Community)श्रद्धास्थान असणाऱ्या मतुआ महासंघाचे संस्थापक हरिचंद्र ठाकूर यांच्या ओरकांडी इथल्या मंदिराला ते भेट देणार आहेत. तसंच बारिसाल जिल्ह्यातील सुगंधा शक्तीपीठालाही ते भेट देणार आहेत. जमल्यास कूसतिया इथल्या रवींद्र कुटी बारीलाही भेट देण्याची शक्यता आहे. या सगळ्या स्थानांबद्द्ल पश्चिम बंगालमधील नागरिकांना प्रचंड जिव्हाळा,अभिमान आहे. त्यामुळं मोदींच्या दौऱ्यात आवर्जून यांचा समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे. प. बंगालमध्ये आपलं वर्चस्व वाढवण्याकरता भाजपनं मतुआ समाजावर लक्ष केंद्रित केलं आहे,कारण यांची संख्या मोठी असून,अनुसूचित जातीत त्यांचा हिस्सा 23.51 टक्के आहे. डाव्या पक्षांकडून तृणमूल कॉंग्रेसकडं सत्ता येण्यात याच समाजाचा मोठा वाटा आहे. त्यामुळं आता भाजपनं या समाजाच्या भावनिकतेला हात घालत त्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला असून,मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यातील भेटी याचंच प्रतीक आहे,असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. हिंदी डॉट न्यूज 18 डॉट कॉमनं हे वृत्त दिलं आहे.

हे ही वाचा-

दरम्यान, बीबीसी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि बांगलादेश यांच्यामधील संबंधांबाबत तिथल्या जनतेत मात्र काहीशी नाराजी आहे. भारतातील भाजप सरकारचा मुस्लिमांबद्दलचा दृष्टीकोन, पश्चिम बंगाल, आसाममध्ये राबवण्यात येणारा नागरिकत्व सुधारणा कायदा, रोहिंग्या मुसलमानांबाबतचं धोरण यामुळं इथल्या जनतेत मोदी यांच्या या दौऱ्याबद्दल फार उत्साह नाही. भारतानं बांगलादेशाशी करार करताना फक्त आपलं हित जपलं असून,तिस्ता पाणी प्रश्नासारखे(Tista MOU)बांगलादेशाच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न तसेच रखडत ठेवले आहेत,असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. बांगलादेशनं भारताला प्रत्येक बाबतीत मदत केली आहे. भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये काही कट्टरतावादी संघटना बांगलादेशातून काम करत होत्या. त्यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी बांगलादेशनं मदत केली आहे. नुकताच फेनी नदीवरील एका पुलाचं(Feni River Bridege)उद्घाटन करण्यात आलं. हा पूल भारतातील ईशान्येकडील राज्यांना थेट बांगलादेशाशी जोडतो. यामुळे या राज्यामधील माल आता थेट चट्टोग्राम बंदरावर(Chattogram Port)नेता येणार आहे. बांगलादेशानं भारताच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत;पण भारतानं बांगलादेशाच्या हिताच्या मुद्द्यांकडं दुर्लक्ष केलं आहे. सीमाभागातील हत्या थांबवण्याबाबतही भारतातील नेतृत्वाला स्वारस्य नाही. रोहिंग्या मुसलमानांबाबत बांगलादेशला अपेक्षित पाठींबा भारताकडून मिळत नाही. मोदी यांच्या या दौऱ्यातदेखील तिस्ता पाणी प्रश्नाचा सामावेश नाही. या करारावर स्वाक्षरी झाली असली तरी पश्चिम बंगालमधील राज्य सरकार अंमलबजावणी करण्यास तयार नसल्याचं सांगत केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत त्यामुळं गेले कित्येक वर्ष या प्रश्नाचं घोंगडे भिजत पडलं आहे,असं इथल्या राजकीय तज्ज्ञांच म्हणणं आहे.

तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध अत्यंत दृढ असून कोणत्याही मुद्द्यांवर तक्रार नसल्याचा दावा बांगलादेश सरकारनं केला आहे. दोन्ही देशांमध्ये केवळ राजकीय संबंध नाहीत तर त्यापेक्षा वेगळं नातं आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले असून त्याच्या अंमलबजावणीत काही अडचणी येत आहेत;पण त्या सोडवण्याचं दोन्ही देशांनी मान्य केलं आहे,असं मत बांगलादेशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए.के.अब्दुल मोमेन(A. K Abdul Momen)यांनी व्यक्त केलं आहे. भारतानं कोरोनावरील लस जगभरातील देशांना पुरवताना बांगलादेशाला प्राधान्य दिलं आहे. गेल्या काही वर्षात बांगलादेशातून भारताला निर्यात(Export)वाढली असून,व्यापारी संबंध वाढले आहेत. तिस्ता करार रखडला असला,तरी त्यात नमूद केल्याप्रमाणेबांगलादेशाला पाणी मिळत आहे,असंही मोमेन यांनी म्हटलं आहे.

द वीक डॉट इननं दिलेल्या वृत्तानुसार,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध दृढ होण्यावर कायमच लक्ष दिलं असून,दोन्ही देशांच्या संबंधांतील अडथळे दूर करण्यावर त्यांचा भर आहे. बांगलादेशचे शेख मुजीब यांना 2020मध्ये महात्मा गांधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी हा पुरस्कार देण्यात आला. मोदी ढाका इथं काही महत्त्वाच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. शेख मुजीबूर यांच्या स्मारकाला भेट देणारे ते पहिले भारतीय नेते आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांना नवीन आयाम देण्याकरता धोरणात्मक दृष्टीनं भारतानं पावलं उचलली आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर,आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत राजकारणाचे संदर्भ जोडल्या गेलेल्या मोदी यांच्या या दौऱ्याची फलश्रुती काय होते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published: March 26, 2021, 12:57 AM IST

ताज्या बातम्या