लंडन, 16 मे: जागतिक लस उत्पादक कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला हे गेल्या महिन्यात लंडनला निघून गेले आहेत. यानंतर आता वडील सायरस पूनावालाही लंडनला रवाना झाले आहेत. सायरस पूनावाला हे सीरम इंस्टीट्यूट समुहाचे अध्यक्ष आहेत. आता वडिलांनीही आपल्या कुटुंबासमवेत लंडन गाठल्यामुळे पूनावाला परिवारानं देश का सोडला याचा तर्क वितर्क लावला जात आहे. पण सायरस पूनावाला यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, युरोपमध्ये लस निर्मिती कंपनी उभारण्याच्या विचारात आहे.
इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सायरस पूनावाला म्हणाले की, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी लंडनला येतो. त्यामुळे आता जी लोकं असं म्हणत आहेत की, मी आणि माझ्या मुलानं देश सोडला आहे. ते सर्व खोटं आणि मूर्खपणाचं आहे. ते पुढे म्हणाले की, 'मी दरवर्षी मे महिन्यात लंडनला येत असतो. लहानपणापासून आदरही इथे येत असतो. त्यामुळे सध्याच्या स्थितीत मी आणि माझ्या कुटुंबीयांनी येथे येणं काही नवीन नाही.
पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ही कंपनी सध्या कोरोना विषाणूवरील कोविशिल्ड नावाची लस उत्पादीत करत आहे. देशातील एकूण 90 टक्के लस याच कंपनीत बनवली जात आहे. त्यामुळे देशाच लसीकरण करण्याची मोठी जबाबदारी आदर पूनावाला यांच्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाब वाढत असल्याचही त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे आदर पूनावाला यांना फोन करून दबाब टाकणारे ते शक्तशाली लोकं नेमकी कोण? हा प्रश्नही राजकीय वर्तुळात गुढ बनून राहिला आहे.
हे ही वाचा- जगातील सर्वात मोठे लस उत्पादक पूनावाला यांनी व्यक्त केली भीती; सरकारकडे केली मागणी
आदर पूनावाला गेल्या एक महिन्यापासून लंडनमध्ये वास्तव्याला असून ते युरोपमध्ये लस निर्मितीचे नवीन युनिट सुरू करण्याचा विचार करत असल्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. याची पुष्टी पुन्हा एकदा सायरस पूनावाला यांनी केली आहे. यावेळी सायरस म्हणाले की, 'सध्या पुण्यात लस तयार केली जात आहे. परंतु आम्ही युरोपमध्ये एक नवीन युनिट स्थापित करण्याच्या विचार करत आहोत. पण आत्ताच, याबद्दल कोणतीही माहिती देणं उतावीळ ठरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Covid-19, Pune