नवी दिल्ली, 03 एप्रिल : कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) संकटाचा सामना करत असलेल्या भारतीयांसाठी दिलासादायक अशी बातमी. जगभरात थैमान घालणा-या कोरोनाव्हायरसचं अवघ्या 5 मिनिटात निदान करणारं किट भारतात लवकरच येणार आहे. अमेरिकेतल्या अबॉट (Abbott) कंपनीने कोरोनाव्हायरससाठी (Coronavirus) असं टेस्ट किट (test kit) तयार केलं आहे, ज्यामुळे फक्त 5 मिनिटात कोरोनाव्हायरसचं निदान होणार आहे. याला ID NOW COVID-19 असं म्हटलं आहे.
CNBC TV18 ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिलपर्यंत हे किट भारतात येऊ शकतं. या किटमुळे कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असल्यास 5 मिनिटांत समजणार आहे, तर कोरोनाव्हायरस नेगेटिव्ह असल्यास 13 मिनिटात समजणार आहे. सध्या लॅबमध्ये RT-PCR पद्धतीने कोरोनाची चाचणी केली जाते. ज्यामध्ये सुरुवातीला स्वॅब नमुने घेतले जातात. या चाचणीचा अहवाल येण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. या प्रक्रियेला लागणारा वेळ खूप आहे, शिवाय खर्चिकही आहे.
मात्र ID NOW COVID-19 हे अगदी लहान आणि कमी वजनाचं असं पोर्टेबल उपकरण आहे, जे कुठेही घेऊन जाणं सोयीस्कर आहे.
कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य संचालन अधिकारी रॉबर्ट फोर्ड यांनी सांगितलं, 'कोविड-19 शी वेगवेगळ्या स्तरावर लढा दिला जातो आहे आणि काही मिनिटात अहवाल देणाऱ्या या पोर्टेबल चाचणीमुळे व्हायरसचं निदान लवकरात लवकर होईल. टेस्ट किट सूक्ष्म आहे, याचा अर्थ रुग्णालयाच्या बाहेरही ही किट वापरता येऊ शकतं' अमेरिकेत या किटच्या वापराला मंजुरी दिल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे आणि आता भारतातही हे किट लवकर उपलब्ध होणार आहे.