आसाम आणि पूर्वेतल्या राज्यांमध्येही नमो नमो!

आसाम आणि पूर्वेतल्या राज्यांमध्येही नमो नमो!

कधी काळी आसाम आणि पुर्वेतली राज्ये ही काँग्रेसचा बालेकिल्ला होती. मात्र काँग्रेसच्या किल्ल्याचा खिंडार पाडत भाजपने तिथे जोरदार मुसंडी मारलीय.

  • Share this:

नवी दिल्ली 19 मे : आसाममध्ये लोकसभेच्या १४ जागा आहेत. २०१४ मध्ये भाजपने ७ जागा जिंकून बाजी मारली होती. तर आसाम गण परिषदेला ३ काँग्रेसला ३ तर अपक्ष उमेदवाराला १ जागा मिळाली होती. तर इतर मणिपूर, अरुणाचल, त्रिपूरा, सिक्किम, नागालँड, मेघालय, मिझोराम या सात राज्यांमध्ये 11 जागा आहेत. अशा एकूण 25 जागा या राज्यांमध्ये आहेत.

न्यूज18 लोकमत आणि IPSOS च्या एक्झिट पोलमधले निकाल काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. इथल्या 25 जागांपैकी भाजप आणि मित्रपक्षांना 17 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 4 ते सहा जागा मिळण्याची शक्यता आहे.

२००४ पासून आसाममध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचा आलेख चढता राहिला आहे. तर काँग्रेस आणि आसाम गण परिषदेची कामगिरी घसरत गेली. कधी काळी पूर्वोत्तरातल्या या महत्त्वाच्या राज्यामध्ये भाजप अस्तित्व फक्त नावापुरतंच होतं. मात्र भाजपने सातत्याने या क्षेत्रात काम करून पक्षाचा विस्तार केला. विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याने पहिल्यांदाच राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करता आली. त्याचा फायदा होण्याची शक्यता भाजपला वाटते.

उत्तर प्रदेशात २०१४ च्या निवडणुकीत भाजपला ८० पैकी तब्बल ७३ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाल्याने भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्याची भरपाई करण्यासाठी भाजपने आसाममध्ये जोर लावला होता.

भाजपने नागरिकत्वाचं विधेयक आणल्याने या राज्यात वादळ निर्माण झालं होतं. घुसखोरांना हाकलून लावण्यासाठीच हे विधेयक असल्याचा दावा भाजपने केलाय. तर हे विधेयक आणून भाजप मुस्लिमांना वेगळं काढत असल्याचा आरोप होतोय. या विधेयकामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, बौद्ध, शिख, पारसी, जैन या धर्मांच्या नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. त्यांची संख्या एवढी वाढली की अनेक मतदारसंघांमध्ये त्यांच वर्चस्व निर्माण झालं. त्यामुळे स्थानिक आसामी नागरिकांना आपली संस्कृतीच धोक्यात आल्याचं वाटतं त्यामुळे राज्यात मोठं आंदोलन निर्माण झालंय. या निवडणुकीच्या प्रचारातही नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा हा मुद्दा चांगलाच गाजला होता.

अरुणाचल प्रदेश - २

अरुणाचल प्रदेशात लोकसभेच्या २ जागा आहेत. २०१४ मध्ये भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी १ जागा जिंकली होती. अरुणाचल प्रदेश हे सीमावर्ती राज्य असल्याने कायम संवेदनशील असंत. या राज्याची सीमा चीनला लागून आहे त्यामुळे चीन सतत या भागातून घुसखोरी करत असतो. भाजपने यावेळी या दोनही जागा जिंकण्यासाठी कंबर कसली होती.

 मिझोराम - १

मिझोराममध्ये लोकसभेची एक जागा आहे. लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. तर यावेळी काँग्रेसला भाजप आणि मित्रपक्षांनी कडवी झुंज दिली होती.

मणिपूर - २

मणिपूरमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. इथेही सलग दोन निवडणुकींमध्ये या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.

मेघालय - २

मेघालयात लोकसभेच्या दोन जागा आहे. २०१४ च्या निवडणुकीत इथे एक जागी काँग्रेसच्या तर एक जागा स्थानिक पक्षाच्या वाट्याला गेली होती.

नागालँड - १

लोकसभेची एक जागा आहे. स्थानिक एनपीएफ या पक्षाला सलग दोन निवडणुकांमध्ये विजय मिळाला होता.

सिक्कीम - १

लोकसभेची एक जागा आहे. इथेही ही जागा २०१४ च्या निवडणुकीत स्थानिक एसडीएफ या पक्षाला मिळाली होती.

त्रिपुरा - २

त्रिपुरामध्ये लोकसभेच्या २ जागा आहेत. २००४,२००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या जागी सीपीएमला मिळाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने डाव्यांची ३० वर्षांची राजवट उलथवून टाकली आणि पहिल्यांदाच राज्यात सत्ता मिळवली. भाजपचा हा ऐतिहासिक विजय होता. त्यामुळे या दोनही जागा मिळतील असा विश्वास भाजपला आहे.

आसाम वगळता पूर्वेतल्या इतर ७ राज्यांमध्ये लोकसभेच्या ११ जागा आहे. गेल्या पाच वर्षात या भागात भाजपने जास्त लक्ष घातलं होतं. पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प अनेक राज्यांमध्ये सुरू झाले. पंतप्रधानही सतत या राज्यांमध्ये जात होते. दर महिन्यात एखादा केंद्रीय मंत्री या राज्यांमध्ये जात राहिल याची काळजी भाजपने घेतली होती. त्रिपुरातल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम या राज्यांमध्ये गेली अनेक वर्ष सुरू आहे त्याचाही चांगला फायदा भाजपला या राज्यांमध्ये पक्ष विस्तारासाठी झाला. या आधी काँग्रेसने स्थानिक अनेक पक्षांशी आघाडी केली होती. ती जागा आता भाजपने घेतली आहे. त्यामुळे या ११ ही जागा जिंकल्याचं उद्दीष्ट भाजपने ठेवलं होतं.

First published: May 19, 2019, 7:36 PM IST
Tags: aasam

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading