नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी - दिल्लीत आप सरकार आणि वाद हे समिकरण कायम जुळलेलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीत आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांनी मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्या कानशीलात लगावल्यानं नवा वाद निर्माण झाला.
या घटनेची तक्रार प्रकाश यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे केलीय. या तक्रारीवरून आपचे आमदार अजय दत्त आणि प्रकाश झारवाल यांच्या विरूद्ध तक्रार नोंदवण्यात आलीय. मुख्यमंत्री कार्यालय आणि आपने हे सर्व आरोप फेटाळून लावले. तर आपचे आशिष खेतान यांनी आपच्या आमदारांना आणि मंत्र्यांना मंत्रालयात जमावानं मारहाण केली असा पलटवार केला.
आय.ए.एस.असोसिएशनने मुख्य सचिवांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत आमदारांविरूद्ध कारवाईची मागणी केलीय. तर घडलेल्या प्रकाराचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मागवला आहे.
बैठकीत काय घडलं?
सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली होती. आधार कार्ड नसल्यामुळे अडीच लाख लोकांना रेशन मिळालं नाही त्यामुळं लोकांमध्ये असंतोष आहे असा आरोप आमदारांनी केला. त्यावर मुख्य सचिवांनी समाधानकारक उत्तर दिलं नसल्यानं आमदार संतप्त झाले आणि त्यांनी मुख्य सचिवांच्या कानशिलात लगावत धक्काबुक्की केली. हा सगळा प्रकार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समक्ष घडल्यानं प्रकार जास्त गंभीर बनला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: AAP, Anshu Prakash, Arvind kejrewal, Delhi, अंशु प्रकाश, अरविंद केजरीवाल, आप