भोपाळ, 23 ऑगस्ट : स्वयंपाकासाठी (Cooking) वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या (LPG Gas prices) किंमती गगनाला भिडल्यामुळे सर्वसामांन्यांचं बजेट (budget) कोलमडून पडलं आहे. गेल्या काही वर्षात तर गॅसच्या किंमती नवनवे उच्चांक गाठत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही एका गावातील महिलांना या बाबीचा काहीच फरक पडत नाही.
गावाची अनोखी योजना
सजरा (Sajra) नावाचं हे गाव आहे मध्यप्रदेशात. या गावात 80 कुटुंबांनी 16 वर्षांपूर्वीच गॅस संयंत्र बसवून घेतलं आहे. या गावातील बहुतांश घरांमध्ये स्वयंपाकासाठी गोबर गॅसचा वापर केला जातो. गावातील जवळपास प्रत्येक कुटुंबाची शेती आहे आणि त्यातील अनेकांकडे गुरं आहेत. गायीम्हशींच्या शेणाचा वापर करून गावातील लोक गॅसची निर्मिती करतात. त्यामुळे त्यांना एलपीजी गॅसवर अवलंबूनच राहावे लागत नाहीत.
गोबर गॅसवर होतो स्वयंपाक
या गावातील जवळपास निम्म्या घरांमध्ये दोन्ही वेळचा स्वयंपाक हा गोबर गॅसचा वापर करून करण्यात येतो. त्याचप्रमाणे पाणी तापवणे, दूध तापवणे, चहा-कॉफी करणे यासारख्या गोष्टीदेखील गोबर गॅसवरूनच करण्यात येतात. या गावातील बहुतांश ग्रामस्थांकडे गायी आणि म्हशी आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर शेण मिळतं. या शेणाचा वापर करून गॅसची निर्मिती केली जाते.
असं आहे गाव
या गावात एकूण 150 कुटुंब राहतात. त्यातील 80 कुटुंबांनी 16 वर्षांपूर्वीच गॅस संयंत्र बसवून घेतलं आहे. त्यातील जवळपास 50 ते 55 कुटुंबांमध्ये नियमितपणे गोबर गॅसचा उपयोग करण्यात येत असल्याची माहिती आहे. शेणाचा उपयोग करून गॅसची निर्मिती करण्यात येते. गॅस निघाल्यानंतर जो ऐवज उरतो, त्याचा उपयोग शेतातील खत म्हणून केला जातो.
16 वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचा खरा फायदा आजच्या काळात दिसत असल्याचं गावचे सरपंच सांगतात. गॅसचे दर गगनाला भिडले असताना गावातील निम्म्याहून अधिक कुटुंबांकडे गोबर गॅस असल्यामुळे खर्चात बचत होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. भविष्यात ही संयंत्र वाढवून अधिकाधिक लोकांना गोबर गॅस पुरवण्याची योजना असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LPG Price, Madhya pradesh