'फेरे घेण्याआधी दोनचा पाढा म्हण', नवरीनं भरमंडपातून केली अडाणी नवरदेवाची हकालपट्टी

'फेरे घेण्याआधी दोनचा पाढा म्हण', नवरीनं भरमंडपातून केली अडाणी नवरदेवाची हकालपट्टी

लग्नासाठी सात फेरे घेण्याआधी नवरीबाईनं (Bride) नवरदेवाची (Groom) परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्याला दोनचा पाढा म्हणण्यास सांगितलं. मात्र, या गणिताच्या परीक्षेत (Maths Test) होणारा नवरोबा फेल झाला

  • Share this:

लखनऊ 04 मे: तुम्ही कधी असा विचार केला का, की गणिताची एक साधी परीक्षा एखाद्याचं लग्न (Marriage) मोडू शकते? कदाचित याचं उत्तर नाहीच असेल. मात्र, आता अशी एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. लग्नासाठी सात फेरे घेण्याआधी नवरीबाईनं (Bride) नवरदेवाची (Groom) परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्याला दोनचा पाढा म्हणण्यास सांगितलं. मात्र, या गणिताच्या परीक्षेत (Maths Test) नवरोबा फेल झाल्यानं तिनं त्याची थेट मंडपातून हकालपट्टी केली.

ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या महोबा (Mahoba) जिल्ह्यातील. मिळालेल्या माहितीनुसार, महोबामधील एका गावात शनिवारी एक अरेंज मॅरेज होणार होतं. त्यासाठी संध्याकाळी नवरदेव वरात घेऊन लग्नाच्या मंडपात पोहोचला. मात्र, त्याआधीच नवरीला कुठून तरी अशी माहिती मिळाली, की नवरदेव तितका शिकलेला नाही, जितकं त्यानं सांगितलं आहे. मग काय, नवरीनं फेरे घेण्याआधी त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं.

जेव्हा एकमेकांना वरमाळा घालण्याची वेळ आली तेव्हा नवरीनं नवरदेवाला दोनचा पाढा म्हणायला सांगितलं. अचानक झालेली ही भलतीच मागणी ऐकून नवरदेव आश्चर्यचकीत झाला. जेव्हा नवरीनं पुन्हा एकदा ओरडून त्याला पाढा म्हणण्यास सांगितलं तेव्हा नवरदेवानं खूप प्रयत्न केले मात्र त्याला पाढा म्हणता आला नाही. यानंतर तरुणीनं त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.

पनवरी ठाण्याचे एसएचओ विनोद कुमार यांनी सांगितलं, की हे एक अरेंज मॅरेज होतं. नवरदेव महोबा जिल्ह्यातील धवार गावातील रहिवासी होता. या लग्नासाठी दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि गावातील काही लोकही मंडपात उपस्थित होते. मात्र, नवरदेवाला दोनचा पाढा म्हणता न आल्यानं नाराज झालेल्या नवरीनं ऐनवेळी लग्नास नकार दिला. तिनं म्हटलं, की ती अशा व्यक्तीसोबत लग्न करू शकत नाही, ज्याला गणिताचं साधं ज्ञानही नाही. मुलीच्या घरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले.

पत्नीला कोरोना झाल्यानं मुलीची जबाबदारी खांद्यावर;पोलीस अधिकाऱ्याचा थेट राजीनामा

नवरीच्या चुलत भावानं सांगितलं, की हे ऐकून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला की नवरदेव अशिक्षित होता. त्यानं सांगितलं, की नवरदेवाच्या घरच्यांनी त्याच्या शिक्षणाबाबत आम्हाला खोटी माहिती दिली होती. बहुतेक तो शाळेतही गेला नसावा. त्याच्या कुटुंबीयांनी आम्हाला धोका दिला. मात्र, माझ्या शूर बहिणीनं लोक काय म्हणतील ही भीती बाजूला ठेवून या लग्नाला नकार दिला.

पोलिसांनी सांगितलं, की यानंतर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांसोबत चर्चा केली आहे. एकमेकांना दिलेले सर्व गिफ्ट आणि दागिने परत देण्यास ते तयार झाले आहेत. त्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही केस दाखल केली नाही.

Published by: Kiran Pharate
First published: May 4, 2021, 12:01 PM IST

ताज्या बातम्या