बंगळुरू, 24 मार्च : सद्यपरिस्थितीत संपूर्ण जगात लॉकडाऊन (Lockdown) सुरू आहे. इटलीत तर कोरोना (Coronavirus) व्हायरसमुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही अनेक राज्यांमध्ये कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाईही केली जात आहे. या अवघड परिस्थितीत बंगळुरुतून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.
बंगळुरुत एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या मदतीसाठी ही तरुणी जीवाचं रान करीत आहे. कोरोनाचा सर्वात जास्त धोका हा वृद्धांना आहे, त्यामुळे वृद्धांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र जे वृद्ध एकटे राहतात, ज्यांची मुलं परदेशात आहेत अशांना मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांना घरातील वस्तू, दूध, अन्न-धान्य आदी आवश्यक गोष्टी आणता येणं अवघड जात आहे. या वृद्धांना मदत करण्यासाठी 32 वर्षीय तरुणी ऐश्वर्या समोर आली आहे. यासंदर्भात तिनं ट्विट केलं आहे.
Anyone has elderly parents living in Bangalore? I am happy to check in on them and maybe run some errands. I am neat. I shower twice. I wash my hands (OFTEN). And I commute by cycle while wearing a mask. I can drop off supplies they need outside their homes. DM me.
त्यात ती म्हणते, ‘जर कोणाचे वृद्ध पालक घरात एकटे असतील, त्यांना खाण्या-पिण्याच्या पदार्थांची गरज असेल तर मला सांगा. मी दोनदा कोरोनाची चाचणी करुन घेतली आहे. आणि मला कोरोनाची बाधा नाही. शिवाय मी वारंवार हात धुवत असते. मी सायकलवर जाऊन त्यांना गरज असलेल्या वस्तू पुरवू शकते’
याबाबत तिने समाज माध्यमांवर लोकांना आवाहन केलं आहे. ऐश्वर्या तत्सम व्यक्तींच्या घराबाहेर जाऊन सामान ठेवून जाते. ऐश्वर्याच्या या कामाच लोकांकडून कौतुक केलं जात आहे.
ऐश्वर्या व्यवसायाने आयटी प्रोफेशल आहे. ती बंगळुरुत नोकरी करते. तिची आई चेन्नईत राहते. माझं काम पाहून आई खूप खूष असल्याचे ऐश्वर्या सांगते. सोशल मीडियावर अनेकजण ऐश्वर्याच्या पावलावर पाऊल ठेवून वृद्धांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.