श्रीनगर, 16 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षादलांनी कारवाईला सुरूवात केली आहे. पुलवामा हल्ल्याचा कट रचल्याच्या संशयावरुन दक्षिण काश्मीरमधील सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांनी पुलवामातील त्रालमध्येच कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्रालमध्येच 2016 ला हिजबुल कमांडल बुरहान वाणीला सुरक्षादलाने चकमकीत ठार केलं होतं.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुलवाना हल्ल्याशी संबंध असल्याच्या संशयावरून अवंतिपुरा आणि आसपासच्या परिसरातील 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्याचा सूत्रधार एक पाकिस्तानी नागरिक असल्याचे म्हटले जात आहे. कामरान नावाच्या जैशच्या दहशतवाद्याने या हल्ल्याचा कट रचला असल्याचा एनआयएला संशय आहे. कामरान पुलवामाच्या परिसरात असल्याची शक्यता असून त्याचा शोधही घेतला जात आहे.
हिजबुलचा कमांडर बुरहान वाणीला ठार केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात काही महिने वातावरण तणावपूर्ण होते. दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या त्रालमध्येच पुलवामा हल्ल्याचा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस जैश-ए-मोहम्मदच्या आणखी एका सदस्याचा शोध घेत आहेत. तो स्थानिक असल्याची माहिती मिळाली असून त्यानेच पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके उपलब्ध करुन दिली होती.
पुलवामा हल्ल्याच्या तपासासाठी एनआय़एच्या 12 जणांचे पथक नेमण्यात आली आहे. या पथकाने शुक्रवारी घटनास्थळावरुन पुरावे गोळा केले आहेत. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी घटनास्थळी जाऊन हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. हल्ल्यानंतर सरकार काय पाऊल उचलणार याचा निर्णय आज केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेतला जाणार आहे.