कोची, 16 ऑगस्ट : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी मराठीत म्हण आहे त्याचा अर्थ काय तर लहानपणी एखाद्या मुलीच्या किंवा मुलाच्या वागण्यातून ती किंवा तो भविष्यात काय करू शकेल याची चुणूक दिसते. काही गुण किंवा कौशल्यं प्रकर्षाने जाणवतात. तसंच काहीसं केरळमधील कोल्लम इथल्या महालक्ष्मी आनंद (Mahalakshmi Anand) या पाच वर्षांच्या चिमुरडीबाबत आहे. मूळची कोल्लमची असलेली महालक्ष्मी सध्या आई नीना आनंद आणि वडिल आनंद कुमार यांच्यासोबत अबुधाबीमध्ये (Abu Dhabi) राहते. आनंद हे व्यवसायाने इंजिनीअर आहेत. महालक्ष्मीची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त आहे की तिनी पाचव्याच वर्षी 9 वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. शाळेचं वय म्हणाल तर ती KG च्या दुसऱ्या वर्षाला आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
महालक्ष्मी दीड वर्षांची असताना तिची स्मरणशक्ती जबरदस्त असल्याचं तिच्या पालकांच्या लक्षात आलं.
एका मिनिटात सर्वाधिक संशोधक आणि त्यांनी लावलेल्या शोधांची नावं सांगणं (Inventors and Inovations ), सर्वांत कमी वेळात म्हणजे 53 सेकंदांत भरतनाट्यम या नृत्यातील (Bharatanatyam Dance) सर्वांत जास्त मुद्रा करून दाखवून त्यांची नावं सांगणं तसंच 26 सेकंदांत भारतातील राज्य आणि त्यांच्या राजधान्यांची नावं सांगणं या तीन गोष्टी इतक्या कमी वेळात करून दाखवणारी ती सर्वांत कमी वयाची मुलगी आहे. त्यामुळे या तिन्ही विभागांतील वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) सध्या महालक्ष्मीच्या नावे आहेत.
वयाच्या पाचव्या वर्षी महालक्ष्मीने पहिलं वर्ल्ड रेकॉर्डचं टायटल पटकावलं होतं, ते होतं एका मिनिटामध्ये सर्वाधिक शास्रज्ञ व त्यांच्या संशोधनांची नावं पाठ म्हणून दाखवण्याचं. यासाठी तिच्या नावे एक राष्ट्रीय रेकॉर्ड (India Book of Records) आणि 3 वर्ल्ड रेकॉर्ड (International Book of Records, British World Records, and Kalams World Records for Extraordinary Grasping Power Genius Kid) नोंदवण्यात आली. तिच्या वयाच्या मानाने ही खूपच मोठी झेप होती.
भरतनाट्यम ही भारतीय पारंपरिक नृत्यशैली आहे यामध्ये 81 मुद्रा असतात. त्यापैकी 55 मुद्रा करून दाखवून त्यांची नावं सांगण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड महालक्ष्मीच्या नावे आहे. तिने केवळ 53 सेकंदांत ही करामत करून दाखवली आहे. कमीतकमी वेळात जास्तीत जास्त मुद्रा करून दाखवल्यामुळे सर्वांत वेगाने भरतनाट्यम मुद्रा सांगून त्या करून दाखवणारी सर्वांत लहान वयाची मुलगी म्हणून तिचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय स्तरावर (National Level) नोंदवलं गेलं आहे.
हे वाचा - Job Alert: इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक इथे वैद्यकीय पदांसाठी जागा रिक्त
तसंच याच कामासाठी तिचं नाव इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्ड्स, ब्रिटिश वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि चॅम्पियन्स बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आलं आहे. महालक्ष्मीला कलामंडलम अमृता दीपक यांनी भरतनाट्यम शिकवलं आहे. विशेष म्हणजे एक वर्षापेक्षा कमी काळात महालक्ष्मीनी भरतनाट्यम इतकं सुंदर शिकून घेतलंय की तिने एक रेकॉर्ड आपल्या नावे केलं आहे.
महालक्ष्मीची आई नीना म्हणाल्या, ‘ महालक्ष्मीला आम्ही जे शिकवायचो किंवा पुस्तकातलं दाखवायचो ते ती लक्षात ठेवायची हे आमच्या लक्षात आलं होतं. ती दीड वर्षांची असताना मी राज्य सरकारी नोकरीसाठी परीक्षेची तयारी करत होते त्या वेळी ती माझ्यासोबत बसायची तेव्हा मी तिला शास्रज्ञ आणि त्यांच्या संशोधनांबद्दल शिकवलं होतं. तिनी ते सगळं स्मरणात ठेवलं. दोन दिवसांनंतर जेव्हा तिला विचारलं तेव्हाही तिनी ते तोंडपाठ म्हणून दाखवलं होतं. तिनी अल्फाबेटिकल क्रमाने शास्रज्ञ आणि त्यांचे शोध शिकत होती. तिची ज्ञानाची जिज्ञासा पाहून आम्हाला थक्क व्हायला होतं. कधीकधी तर ती असे काही प्रश्न विचारते की मी आणि माझे पतीही त्याची उत्तरं देऊ शकत नाही. अशावेळी आम्ही गुगलच्या मदतीने तिच्या प्रश्नांची उत्तरं देतो.’
आपल्या मुलाच्या कौशल्यांची दखल घेऊन त्यानुसार त्याला पाठिंबा देणं हे अनेक पालक करतात. त्याला कुठल्या विषयात गती आहे ते ओळखून त्या पाल्याला योग्य मार्गदर्शन करतात त्यातूनच नव्या पिढीतील मोठी व्यक्तिमत्वं घडतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kerala, World record