नवी दिल्ली, 02 जुलै : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 19 हजार 148 नवीन प्रकरणं समोर आली. तर, 434 जणांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 6 लाख 4 हजार 641 झाली आहे. देशात सध्या 2 लाख 26 हजार 947 सक्रिय रुग्ण आहेत तर, 17 हजार 834 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 3 लाख 59 हजार 859 रुग्ण निरोगी होऊन घरी परतले आहेत. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 59.51% आहे.
कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, देशात अजूनही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात दिवसागणीक रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 5 हजार 537 नवीन रुग्ण समोर आले. तर, 198 जणांचा मृत्यू झाला. यात गेल्या 24 तासांत 69 जणांचा मृत्यू झाला.
434 deaths and 19,148 new #COVID19 cases in the last 24 hours. Positive cases in India stand at 6,04,641 including 2,26,947 active cases, 3,59,860 cured/discharged/migrated & 17834 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/rlKaWwgkXy
दरम्यान, येत्या 5 दिवसांत देश 6 लाखांचा आकडा पार करू शकतो. यानंतर जगातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या आकड्यात भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश असेल. रशियाला मागे टाकून सध्या चौथ्या क्रमांकावर असलेला भारत तिसऱ्या क्रमांकावर जाईल.
देशात आतापर्यंत 90 लाख जणांची चाचणी करण्यात आली आहे. मात्र सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे (CCMB) प्रमुख राकेश मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला चाचणी क्षमता जवळपास 10 पट वाढवण्याची गरज आहे. सोमवारी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलासाई सुंदरराजन आणि इतरांसह व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान त्यांनी हे सांगितले.
देशात पहिला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आज 100वा दिवस आहे. यातच मुंबई हे कोरोनाचे केंद्र झाल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे देशात आणि राज्यात अनलॉक 2.0 ला (Unlock 2.0) सुरुवात झाली असली तरी, लॉकडाऊन कायम आहे. यात मुंबईतील पाच मोठ्या महापालिकांनी मात्र आजपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पनवेल यांचा समावेश आहे. या पाच शहरांमध्ये कोरोनाचा होत असलेला उद्रेक पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.