नवी दिल्ली, 28 एप्रिल: कोरोनामुळे भारतातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोना विषाणूच्या या दुसर्या लाटेत (Corona Second Wave) देशात एकूण मृतांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. मंगळवारी देशात (India corona Update) प्रथमच एका दिवसात मृतांची संख्या 3 हजारांच्या पुढे गेली. मंगळवारीही सलग सातव्या दिवशी भारतात 3 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सलग आठव्या दिवशी 2 हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 3,286 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 2,01,180 वर गेली. देशात कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच भारतात एकाच दिवसात 3 हजारापेक्षा जास्त मृत्यू नोंदले गेले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 3,62,770 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
जगात कोरोनामुळे झालेल्या मृतांमध्ये अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. मंगळवारपर्यंत अमेरिकेत 5,87,373 लोक मरण पावले आहेत. ब्राझील 3,95,324 मृत्यूसह दुसर्या स्थानावर आहे तर मेक्सिकोमध्ये 2,15,113 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. आतापर्यंत एकूण मृत्यूंच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. याव्यतिरिक्त, युके, इटली, रशिया आणि फ्रान्समध्ये लाखाहून अधिक कोरोनाबाधित लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा सर्वाधिक कोरोना रुग्ण
मंगळवारी केरळ - 32,819, पश्चिम बंगाल - 16,403, तामिळनाडू - 15,830, गुजरात - 14352, हरियाणा - 11,931, तेलंगणा - 10,122, उत्तराखंड - 5,703, जम्मू-काश्मीर 3,164 आणि हिमाचल प्रदेश 2,157 बाधित रुग्णांची नोंद झाली. पद्दुचेरीमध्ये 1,021 आणि चंदीगडमध्ये 837 रुग्ण आढळले. गेल्या 24 तासांत एकूण 15 राज्यांमध्ये 10 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहेत.
हे वाचा - कराच्या पैशांना म्हणाल्या दान; 1 कोटींची मदत करुनही किरण खेर होतायेत ट्रोल
महाराष्ट्रात सर्वाधिक 66,358 रुग्णांची नोंद झाली तर यूपी, केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. या तीन राज्यात 30,000 हून अधिक बाधितांची भर पडली. राजधानीत दिल्लीत 24,149 प्रकरणे नोंदविण्यात आली. त्याचवेळी मंगळवारी पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये 16,000 हून अधिक रुग्ण आढळून आले. तामिळनाडू, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, आंध्र आणि तेलंगणामध्ये 10 हजार ते 15 हजार दरम्यान कोरोना रुग्ण सापडले आहेत. ओडिशा, झारखंड, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये 3 हजार आणि जम्मू-काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश, गोवा आणि पुडुचेरीमध्ये एक हजार ते तीन हजारच्या दरम्यान नवीन बाधितांची नोंद झाली आहे.
मंगळवारी 13 लहान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1000 पेक्षा कमी रुग्ण आढळले. मंगळवारी नऊ राज्यात शंभराहून अधिक मृत्यू झाले. महाराष्ट्रात 895 मृत्यू तर त्यानंतर दिल्लीत गेल्या 24 तासांत 381 मृत्यू झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus cases