Home /News /national /

काळा दिवस! मुंबईत पोहोचणारं विमान हवेत असताना झाला बाँबस्फोट, 329 निष्पापांनी गमावला होता जीव

काळा दिवस! मुंबईत पोहोचणारं विमान हवेत असताना झाला बाँबस्फोट, 329 निष्पापांनी गमावला होता जीव

टोरांटोहून माँट्रियल, लंडन, दिल्ली या ठिकाणी थांबून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) एम्परर कनिष्क (Emperor Kanishka) या विमानात 23 जून 1985 रोजी बॉम्बस्फोट झाला.

नवी दिल्ली, 23 जून: काही दिवसांचं इतिहासात विशेष महत्त्व असतं. काही चांगल्या, काही वाईट घटना त्या दिवशी घडलेल्या असतात. काही घटनांचे दूरगामी परिणाम होतात, तर काही घटना घडतात आणि विस्मृतीतही जातात. 23 जून या दिवशीही अनेक घटना इतिहासात घडलेल्या आहेत. इसवी सन 930मध्ये 23 जून रोजी आइसलँड या देशात जगातली पहिली संसद सुरू झाली होती. 23 जून 1980 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. 23 जून 1985 हा दिवस भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे इतिहासात काळ्या अक्षरांनी नोंदवला गेला. टोरांटोहून माँट्रियल, लंडन, दिल्ली या ठिकाणी थांबून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) एम्परर कनिष्क (Emperor Kanishka) या विमानात 23 जून 1985 रोजी बॉम्बस्फोट झाला. त्यात विमानातले 307 प्रवासी आणि 22 क्रू मेंबर्स अशा सर्व 329 निरपराध व्यक्तींचा मृत्यू झाला. 1984 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानंतर अमृतसरच्या सुवर्णमंदिरातल्या ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये (Operation Blue Star) खलिस्तानी अतिरेकी जर्नैलसिंग भिंद्रनवाले (Bhindranwale) याला भारतीय जवानांनी ठार केलं होतं. त्यानंतर इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्याविरोधात शीख समुदायामध्ये क्षोभ उसळला होता. त्याच वर्षी इंदिरा गांधी यांच्या दोन शीख बॉडीगार्ड्सनी त्यांची हत्या केली होती. याच ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी एअर इंडियाच्या विमानात बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं सांगितलं जातं. हे वाचा-कोरोनाला दीड वर्ष पूर्ण, जाणून घ्या सविस्तर आतापर्यंतचा रुग्णांचा आकडा 23 जूनला कॅनडातील टोरांटो (Toronto) इथल्या पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलेलं एअर इंडियाचं कनिष्क हे विमान माँट्रियलला थांबून लंडनकडे (London) निघालं. तिथे पोहोचायला पाऊण तास असताना अटलांटिक महासागरावर (Atlantic Ocean) असताना या विमानात बॉम्बस्फोट झाला आणि जळत्या स्थितीत विमान महासागरात कोसळलं. त्यात कॅनडातले 268, इंग्लंडचे 27, अमेरिकेतले 10 आणि भारताचे दोन नागरिक होते. 329 जणांपैकी केवळ 132 नागरिकांचे मृतदेहच मिळू शकले. हा दहशतवादी हल्ला बब्बर खालसा (Babbar Khalsa) या शीख संघटनेने केल्याचा ठपका ठेवण्यात आला. या विमानातून एम. सिंग नावाचा एक प्रवासी प्रवास करणार होता; मात्र त्याचं केवळ सामानच विमानात चढवलं गेलं. तो प्रवासी चढलाच नाही. त्याच सामानात असलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. एम. सिंग नावाचा तो प्रवासी नंतरही कधीच सापडू शकला नाही. हे वाचा-1000 लोकांच्या धर्मांतरामागे आहे पाकिस्तानचा हात? ATS तपासात या 10 गोष्टी उघड पाच महिन्यांनंतर तलविंदरसिंग परमार आणि इंद्रजितसिंग रेयात या दोघांना अटक झाली. तलविंदरसिंगवर आरोप सिद्ध होऊ न शकल्याने त्याची निर्दोष मुक्तता झाली. इंद्रजितसिंगला 2003मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. एअर इंडियाच्या आणखी एका विमानात स्फोट घडवण्याचं अतिरेक्यांचं नियोजन होतं. व्हॅक्युव्हरमधून बँकॉकला जाणाऱ्या विमानात असाच बॉम्ब ठेवण्यात आला होता. तो बॉम्ब टोकियोच्या विमानतळावर फुटला. त्यात विमानतळावरचे दोन कर्मचारी ठार झाले. या स्फोटप्रकरणीही इंद्रजितसिंगला 10 वर्षांची सजा सुनावण्यात आली.
First published:

Tags: Air india, Bomb Blast

पुढील बातम्या