Home /News /national /

तब्बल 23 लाखांहून कोरोना लशीचे डोस वाया, का आणि कसे?

तब्बल 23 लाखांहून कोरोना लशीचे डोस वाया, का आणि कसे?

भारताची कोविड-19 लसीकरण (India’s Vaccination Drive) मोहीम जगातील दुसर्‍या क्रमांकाची लसीकरण मोहीम (World’s Second Largest Vaccination Drive) आहे. मात्र लसीकरण मोहिमेचा वेग आणखी वाढवणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.

नवी दिल्ली, 20 मार्च : केंद्र सरकारकडून आतापर्यंत 7 कोटींपेक्षा अधिक कोविड 19 च्या लसीचे डोस (Covid 19 Vaccine Doses) राज्यांना (States) पुरवण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे 3.46 कोटींपेक्षा अधिक डोस लोकांना देण्यात आले आहेत, त्याचबरोबर 6.5 टक्के म्हणजे तब्बल 23 लाखांहून अधिक डोस वाया (Wastage) गेले असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लस वाया गेल्याचं उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना लसीचा तत्काळ आणि जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशाप्रकारे लस वाया जाण्यामागे नेमके कारण काय आहे? कोव्हीशील्डच्या (Covishield) प्रत्येक पॅकमध्ये एकूण 10 डोस असतात, तर कोव्हॅक्सिन (Covaxin) पॅकमध्ये 20 डोस असतात. प्रत्येक डोस 0.5 मिली (एका व्यक्तीसाठी) असतो. एकदा उघडल्यानंतर सर्व डोस चार तासाच्या आत देणं आवश्यक आहे, अन्यथा ते वाया जातात. ते डोस नष्ट करावे लागतात. अशाप्रकारे लस वाया गेल्यामुळे लसीकरण मोहिमेचा (Vaccination Drive) वेग कमी होऊ शकतो. चार तासांच्या आत लसीचा डोस देणं आवश्यक असल्याने त्याबाबत दक्षता घेणं आवश्यक आहे. दिल्लीतील एलएनजेपी (LNJP) या सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार म्हणाले, ‘उदाहरणार्थ, संध्याकाळी सहा वाजता लशीचं पॅकेट उघडलं आणि त्यानंतर लोक कमी संख्येनं येत असल्याने दोनच लोकांचं लसीकरण झालं, तर उरलेल्या लसीचे डोस नष्ट करणं भाग असतं.’ ‘एका पॅकमध्ये एकच डोस असणं परवडण्यासारखं नाही. कारण याचं पॅकेजिंग महाग असतं. वाहतुकीच्या समस्याही असतात. या लस सर्वसामान्य जनतेसाठी तयार केल्या जातात. म्हणूनच, लसीकरण करून घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी येण्याची गरज आहे, असंही डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितलं.

(वाचा - गायत्री मंत्राच्या जपामुळे Covid-19 बरा होईल का? शास्त्रज्ञांनी सुरू केला अभ्यास)

हे नुकसान टाळता येणं शक्य आहे का? भारताची कोविड-19 लसीकरण (India’s Vaccination Drive) मोहीम जगातील दुसर्‍या क्रमांकाची लसीकरण मोहीम (World’s Second Largest Vaccination Drive) आहे. मात्र लसीकरण मोहिमेचा वेग आणखी वाढवणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. ‘लसीकरण केंद्रांना सुमारे एक किलोमीटर अंतराच्या परिघातील लोकांची माहिती देण्यात यावी जेणेकरुन ते लोकांना लस घेण्याकरता येण्यासाठी कॉल करू शकतील. यामुळे लस वाया जाणं टाळता येईल. एकदा पॅक उघडला की चार तासाच्या आता सर्व डोस देणं आवश्यक आहे अन्यथा चार तासानंतर उरलेले डोस टाकून देणं भाग आहे. या मर्यादेवर मात करण्यासाठी ही बॅकअप यादी (Backup list) महत्वाची ठरेल. या यादीमध्ये सध्याच्या टप्प्यासाठी पात्र नसलेल्या लोकांचाही समावेश करता येईल. कारण डोस फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर होणं महत्त्वाचं आहे,’ असं सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ दिलीप मावळणकर यांनी ‘न्यूज 18’ला सांगितलं. ते पुढे म्हणाले, ‘देशभरात लस वितरित करण्याची एक पद्धत निश्चित करण्यात आली आहे, परंतु सध्या ज्या जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या वाढत आहे, तिथे डोस पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. देशातील पन्नास जिल्ह्यांमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आहेत. या जिल्ह्यांतील प्रत्येकाला लस दिल्यास विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल.’

(वाचा - कोरोना लशीमुळे आजारी पडलात तर विमा कंपनी उचलणार खर्च? सरकारने घेतला मोठा निर्णय)

लस वाया जाणं थांबवण्यासाठी सध्याचे पात्रता निकष बदलणं आवश्यक आहे, असं मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. फक्त वृद्ध आणि काही आजार असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अन्य वयोगटातील लोकांचाही यात समावेश केल्यास हा प्रश्न सोडवणं शक्य होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी ‘न्यूज18’ ला सांगितलं की, लसीकरण मोहिमेच्या विस्तारीकरणाबाबत विचार सुरू असून, सध्याच्या टप्प्यातील लोकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण व्हावं, अशी सरकारची इच्छा आहे. नीति आयोगाचे (NITI Aayog) सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी साप्ताहिक आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) बैठकीत सांगितलं की, 'हे अत्यंत मौल्यवान औषध वाया जाणं ही प्रत्येक व्यक्तीसाठी आणि संपूर्ण देशासाठीही अत्यंत वाईट गोष्ट आहे.’ आरोग्य सचिव (Health Secretary) राजेश भूषण म्हणाले की, ‘ही लस अत्यंत अमूल्य असल्याचा संदेश आम्ही राज्यांना दिला आहे. सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करणारी ही बाब आहे, त्यामुळे त्याचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणं अत्यावश्यक आहे. लशीचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी करावा लागेल. लशीचा अपव्यय कमी याचा अर्थ ती अधिकाधिक लोकांना मिळेल आणि संक्रमणाची साखळी तोडण्यात यश येईल.’

(वाचा - दारूसाठी कोव्हिड सेंटरमधून पॉझिटिव्ह रुग्ण पळाला, उचलून रुग्णालयात आणलं परत)

लस वाया जाण्याचे राज्यनिहाय प्रमाण : बर्‍याच राज्यांमध्ये (States) लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या 6.5 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तेलंगणात हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 17.5 टक्के, आंध्र प्रदेशात 11.6 टक्के, तर उत्तर प्रदेशात 9.4 टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत लस वाया जाण्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. लसीचा एकही डोस वाया जाऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी राज्यांना केली. ‘तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात दहा टक्क्यांपेक्षा जास्त डोस वाया गेले आहेत. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा हक्क असलेली गोष्ट वाया घालवण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्यांनी लसीचा एकही डोस वाया न घालवण्याचं उद्दिष्ट ठेवावं. जितके जास्त डोस वाचवता येतील तितक्या जास्त पात्र लोकांना ते मिळतील, हे लक्षात घ्या.’ असं आवाहन मोदी यांनी केलं.
First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost, Corona virus in india, Vaccination

पुढील बातम्या