अमित तिवारी
लखनौ, 5 एप्रिल : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. सामाजिक न्यायाने परिवर्तन अशी त्यांची घोषणा आहे. समाजवादी पक्षाचं सरकार आलं तर श्रीमंत सवर्णांवर 2 टक्के कर लावू, असं त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना म्हटलं आहे.
मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. पण अखिलेश यांनी मात्र संपत्ती जास्त असलेल्या सवर्णांवर कर लावण्याचं आश्वासन दिलं आहे.
काही मोजक्या धनिकांकडे देशातली सगळी संपत्ती एकवटली आहे. गरिब मात्र दिवसेंदिवस आणखी गरीब होत चालले आहेत, असं अखिलेश यादव म्हणाले. ज्यांची संपत्ती अडीच कोटींपेक्षाही जास्त आहे अशा लोकांवर आम्ही वाढीव कर लावू, असं त्यांनी सांगितलं.
आमचं सरकार आल्यावर आम्ही केंद्रीय आरक्षणाची नवी आकडेवारी जाहीर करू. त्यामुळे देशातल्या प्रत्येक जातीमधल्या लोकांची स्थिती कळू शकेल, असंही अखिलेश यांनी म्हटलं आहे.
एकीकडे सवर्णांवर कर, आरक्षणाची नवी आकडेवारी अशा घोषणा करतानाच जाती, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन सुवर्णक्रांती घडवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
भारताच्या लोकसंख्येमध्ये तरुणांची संख्या सगळ्यात जास्त आहे. देशाच्या लोकसंख्येच्या निम्मे लोक 25 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. यातले बहुतांश तरुण बेरोजगार आहेत. बेरोजगारी हेच देशापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, असंही अखिलेश म्हणाले.
नोटबंदीमुळे देशातल्या तरुणांचा रोजगार गेला तर जीएसटीमुळे छोटे उद्योग बंद झाले. तरीही पंतप्रधान मोदी सरकारच्या कामावर विश्वास ठेवा, असं सांगत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
देशातल्या शेतकऱ्यांच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्राधान्य दिलं पाहिजे, असं म्हणाले.
================================================================================================================================================================
भाजपचं टार्गेट शरद पवारच आहे का?, मुख्यमंत्र्यांची UNCUT मुलाखत