बरेली, 1 नोव्हेंबर : हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांमध्ये घटस्फोटाबाबतचे नियम वेगवेगळे आहेत. मुसलमान धर्मात 3 वेळा तलाक म्हटल्यास तो घटस्फोट ग्राह्य धरला जातो. या नियमामुळेच बरेलीमध्ये 2 मुस्लिम मुलींनी धर्मांतर करून हिंदू धर्मात प्रवेश करून हिंदू पद्धतीनं लग्न केलं. 'दैनिक भास्कर'ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.
इरम जैदी आणि शहनाज या 2 मुसलमान मुलींनी बरेलीतल्या एका मंदिरात हिंदू धर्म स्वीकारला. त्यानंतर त्या दोघींनी त्यांच्या मित्रांसोबत पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न केलं. तसंच नोंदणीही केली.
इरम जैदी 19 वर्षांची असून तिनं आदेश कुमार याच्यासोबत लग्न केलं. आपलं वय लग्नासाठी पात्र असून आपल्या मर्जीनं जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असल्याचं इरम म्हणाली. “माझ्याच भागात राहणाऱ्या आदेश कुमार याच्यावर माझं प्रेम होतं. आमच्यात चांगली मैत्री आहे. त्यामुळे आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला,” असं तिने सांगितलं. आदेशच्या कुटुंबीयांनीही आपल्याला स्वीकारलं असून आदेशसाठी जाणीवपूर्वक धर्मपरिवर्तन करत असल्याचं तिनं सांगितलं.
बरेलीतल्या शागलपूरची रहिवासी असलेली शहनाज हिचा जन्म 10 जुलै 2004 रोजी झाला आहे. आपण कळत्या वयातल्या असून लग्नासाठी निवड स्वातंत्र्य असलं पाहिजे, असं ती म्हणते. “मी दहावी शिकले आहे. अजय कुमार याच्यावर माझं प्रेम आहे. माझं प्रेम आणि भविष्य याचसाठी मी धर्मपरिवर्तन करून अजयसोबत लग्न करत आहे,” असं शहनाज म्हणाली.
'मुस्लिम धर्मात 3 वेळा तलाक म्हटलं, की घटस्फोट होतो. जी मुलगी घर, कुटुंबाला सोडून सासरी येते, आयुष्यभर बुरख्यात राहते, तिला केवळ 3 वेळा तलाक म्हणून घटस्फोट देता येतो. असं हिंदू धर्मात नाही. मुस्लिमांमध्ये सुनेला घरात जेवढं अडकून पडावं लागतं, तेवढं हिंदू धर्मीय मुलींना राहावं लागत नाही. त्यामुळे मला हा धर्म आवडतो,' असं शहनाज सांगते. बरेलीच्या भारत इंटर कॉलेजमधून शहनाजनं 2020मध्ये दहावीची परीक्षा दिली आहे. तिचा नवरा अजय कुमार याने त्याच कॉलेजमधून 2017मध्ये दहावी पूर्ण केली आहे.
हेही वाचा - Extra Marital Affair चा संशय, पत्नी आणि तिच्या प्रियकर सरपंचाला बेदम मारहाण
बरेलीमधल्या मढीनाथ इथल्या अगस्त मुनी आश्रमात त्यांचा लग्नसोहळा झाला. त्याआधी दोघींचा शुद्धिकरण विधी झाला. त्यानंतर त्यांचं धर्मपरिवर्तन करून नाव बदलण्यात आलं. इरम जैदी हिला स्वाती, तर शहनाज हिला सुमन असं नाव देण्यात आलं. पंडित शंखधार यांनी त्यांचं लग्न लावलं.
दरम्यान, शहनाज तिच्या नवऱ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिचे कुटुंबीय धमकी देत असल्याचं तिथे तिने सांगितलं. त्यावर एसएसपी अखिलेश चौरसिया यांनी सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं. त्याच वेळी नवरा अजय कुमार याला पत्नीला नीट सांभाळण्याबद्दलही सांगितलं. दोन्ही मुसलमान मुलींचं हिंदू धर्मातल्या रीतीरिवाजानुसार लग्न करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hindu, Marriage, Muslim, Uttar pradesh