मुंबई, 18 जून : रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) गुरुवारी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11 वी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. गेल्या 9 आठवड्यांत सलग 10 गुंतवणुकदारांनंतर आता सौदी अरेबिया सॉवरेन वेल्थ फंड पीआयएफ 2.32 टक्के भागभांडवलसाठी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. 22 एप्रिलनंतर जिओ प्लॅटफॉर्ममधील ही 11 वी गुंतवणूक आहे. याबरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या युनिटने गेल्या 9 आठवड्यांत जागतिक गुंतवणुकदारांना 24.7 टक्के हिस्सा विकून 1.15 लाख कोटी रुपये मिळवले आहेत.
आतापर्यंत जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 24.7 टक्के हिस्सेदारीच्या तुलनेत एकूण 1,15,693.95 कोटी रुपये आले आहेत. जिओमध्ये गुंतवणूक करणार्या कंपन्यांच्या यादीमध्ये जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकदारांचा समावेश आहे. पीआयएफने जिओचे इक्विटी मूल्यांकन 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइझचे मूल्यांकन 5.16 लाख कोटी रुपयांचा अनुमान लावला आहे. अलीकडे खासगी इक्विटी कंपन्या एल कॅटरटन आणि टीपीजीने जिओमध्ये गुंतवणूक जाहीर केली आहे.
या कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक करण्याचीही घोषणा केली आहे
22 एप्रिल रोजी सोशल मीडिया कंपनी फेसबुकने 9.99 टक्के भागभांडवलसाठी 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली होती. ही मोठ्या स्तरावरील चांगली सुरुवात आहे. त्यानंतर जनरल अटलांटिक, सिल्व्हर लेक पार्टनर्स (दोन वेळा), व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, केकेआर, मुबाडाला इन्व्हेस्टमेंट कंपनी एडीआयए, टीपीजी आणि एल कॅटरटन यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे. सध्या जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या 40 कोटींपेक्षा जास्त आहे आणि ही कंपनी चांगल्या गुणवत्तेत आणि परवडणार्या दरामध्ये डिजिटल सेवा प्रदान करते.
हे वाचा-LIC ची खास पॉलिसी! एकदा गुंतवणूक करून मिळेल 65 हजारांची पेन्शन, वाचा सविस्तर