Home /News /nashik /

नाशिकमध्ये भीषण जलसंकट : जीव धोक्यात टाकून महिलांची थेट विहिरीतून पायपीट, अस्वस्थ करणारा VIDEO समोर

नाशिकमध्ये भीषण जलसंकट : जीव धोक्यात टाकून महिलांची थेट विहिरीतून पायपीट, अस्वस्थ करणारा VIDEO समोर

नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. दोन-चार किलोमीटर पायपीट करून महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी भरावं लागत आहे.

    नाशिक, 15 एप्रिल : उन्हाळा (Summer season) सुरू होताच राज्याच्या अनेक भागांत तीव्र पाणीसंकटाची (Water crisis) चाहूल लागली आहे. ग्रामीण भागात पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. दोन-चार किलोमीटर पायपीट करून महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी भरावं लागत आहे; मात्र तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीची स्थिती चांगली आहे, असं सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नाशिक (Nasik) जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात रोहिले (Rohile vilage) नावाचं गाव आहे. या तालुक्यात पर्जन्यमान चांगलं असलं, तरी उन्हाळा सुरू होताच इथल्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होते. रोहिले गावातल्या एका विहिरीतून पाणी भरतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका विहिरीजवळ महिला आणि मुलांची गर्दी दिसून येत आहे. पाणी भरण्यासाठी विहिरीजवळ भांडी ठेवण्यात आली आहेत. विहिरीत पाणी आहे; मात्र ते भरणं सोपं नाही. कडक उन्हामुळे विहिरीतल्या पाण्याची पातळी खूपच कमी झाली आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी दोन महिला शिडीच्या साह्यानं विहिरीत उतरल्याचं व्हिडिओत दिसतं. ग्रामस्थ दोरीच्या साह्यानं प्लास्टिकचे डबे त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यानंतर पाण्यामधल्या शिडीवर उभं राहून या महिला पाणी भरून वर पोहोचवत आहेत. हे काम खूपच धोकादायक आहे. थोडीशी चूक झाली, तरी दोन्ही महिला थेट विहिरीत पडू शकतात. परंतु यावर त्यांच्याकडे काहीच इलाज नाही. विहिरीतून पाणी भरणाऱ्या सोनाली नावाच्या महिलेने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, की महिला दोन किलोमीटर दूरवरून विहिरीतलं पाणी भरण्यासाठी येतात. आमच्याकडे पाण्याची समस्या आहे. काही महिला पाणी काढण्यासाठी थेट विहिरीतच उतरल्या. (राज ठाकरेंची घोषणा मोदींच्या मतदारसंघापर्यंत, वाराणसीत मंदिरं-घरांवर भोंगे चढले, हनुमान चालीसा पठण) दहावीत शिकणारी प्रिया सांगते, की 'कुटुंबाची तहान भागवण्यासाठी दूरच्या गावात जाऊन पाणी आणावं लागतं. त्यामुळे मध्येच शाळा सोडून जावं लागतं. आमच्या गावात पाणी नाही. त्यामुळे आम्हाला दूरच्या गावात जावं लागतं. कधी-कधी मला अभ्यास सोडून जावं लागतं. एकदा दुसऱ्या गावात विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यामुळे मला परीक्षेसाठीही उशीर झाला होता.' परंतु पाण्याच्या या गंभीर समस्येवर सिंचन विभागाची भूमिका नेहमीप्रमाणे गुळमुळीत दिसून आली आहे. 'या वर्षी पाण्याची समस्या कमी आहे. नाशिकमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याची स्थिती चांगली आहे. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातून पाण्याच्या मागणीचा रिपोर्ट मागवतो आणि नंतर लोकांपर्यंत पाणी पोहोचवतो. जूनपर्यंत पाण्याची कमतरता जाणवणार नाही,' अशी माहिती सिंचन विभागाच्या अभियंता अलका अहिरराव यांनी दिली आहे.

    तुमच्या शहरातून (नाशिक)

    First published:

    पुढील बातम्या