कोकाटेंच्या शाही विवाहात गर्दीचे नियम पायदळी, काही वेळा नाईलाज असतो म्हणत अजित पवारांकडूनही पाठराखण

कोकाटेंच्या शाही विवाहात गर्दीचे नियम पायदळी, काही वेळा नाईलाज असतो म्हणत अजित पवारांकडूनही पाठराखण

नाशिकमध्ये आ. कोकोटे यांच्या कन्येच्या लग्नाला कोरोना काळात घालून दिलेल्या सर्व नियमांचं उल्लंघन झाल्याचं चित्र दिसलं. या लग्नाला उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही कोकाटेंची पाठराखण केली.

  • Share this:

नाशिक, 1 जुलै : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले, तेच मुळी एका लग्न सोहळ्यासाठी. नाशिकमध्ये आमदार ऍड. माणिकराव कोकाटे यांची कन्या सिमंतिनी कोकाटे यांचा विवाह सोहळा आयोजित (Marriage) करण्यात आला होता. या लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवारांना आग्रहाचं आमंत्रण होतं. या लग्नाला कोरोना काळात घालून दिलेल्या सर्व नियमांचं उल्लंघन झाल्याचं चित्र दिसलं. शेकडो लोक (Crowd of hundreds) यासाठी एकत्र आले होते. अजित पवारांऩा यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनीही कोकाटेंची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.

समाजात वावरत असताना काही गोष्टी पाळायच्या असतात आणि काही नाती जपायची असता. कोरोना काळात कुणीही, कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं चुकीचंच आहे, पण काही वेळा नाईलाज असतो, असं म्हणत त्यांनी या सोहळ्यातल्या स्वतःच्या उपस्थितीवर स्पष्टीकरण दिलं. आपण जेव्हा लग्नाला गेलो होतो, त्यावेळी तिथल्या 100 टक्के उपस्थितांच्या चेहऱ्यावर मास्क होते आणि कुणीही बेजबाबदारपणे वागत नव्हतं, असं सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत.

मुळात, हा विवाह सोहळा पूर्वनियोजित होता. त्यामुळे याच दिवसाचं निमित्त साधून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नाशिक दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वसामान्यांच्या लग्नात सरकारनं नेमून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक व्यक्ती असतील, तर लगेच पोलीस कारवाई करतात. पण लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांच्या लग्नात तोच नियम पाळला जातो का, याबाबत अजित पवार यांना छेडलं असता, पवारांनी गर्दी करणं चुकीचं असल्याचं मान्य केलं. जी गोष्ट चूक आहे, तिला चूकच म्हटलं पाहिजे. गर्दी करणं हे चुकीचंच आहे. मात्र काही वेळा नाईलाज असतो, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे लग्नात मर्यादेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती, याची अप्रत्यक्ष कबुलीच दिल्याचीं चर्चा त्यानंतर सुरू झाली.

कोरोना काळात सध्या कार्यक्रमांवर बंधनं घालण्यात आली असून लग्नाला 50 पेक्षा जास्त जणांनी उपस्थित राहू नये, असा नियम सरकारनं केला आहे. मात्र लोकप्रतिनिधी स्वतः हा नियम कितपत पाळतात, हा नाशिककरांमध्ये सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

Published by: desk news
First published: July 1, 2021, 6:42 PM IST

ताज्या बातम्या