Home /News /nashik /

बायको गेली माहेरी, मद्यधुंद इसम चढला 350 फूट उंच मनोऱ्यावरी

बायको गेली माहेरी, मद्यधुंद इसम चढला 350 फूट उंच मनोऱ्यावरी

दारु चढली की लोक चंद्रावर जातात असे म्हटले जाते. पण निफाड येथे मात्र एक मद्यधुंद मजनू आकाशातल्या चंद्रा ऐवजी थेट दूरसंचारच्या तीनशे पन्नास फूट उंचीच्या मनोऱ्यावर चढून बसला.

    नाशिक, 22 जानेवारी : दारु चढली की लोक चंद्रावर जातात असे म्हटले जाते. पण निफाड येथे मात्र एक मद्यधुंद मजनू आकाशातल्या चंद्रा ऐवजी थेट दूरसंचारच्या तीनशे पन्नास फूट उंचीच्या मनोऱ्यावर चढून बसला. बायको माहेरी गेल्याचा राग आल्याने आपण मनोऱ्यावर चढलो असे त्याचे म्हणणे होते. निफाड-नाशिक रस्त्यावरील जळगाव फाटा येथे असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या साडे तीनशे फूट उंच मनोऱ्यावर आज रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जवळच्याच झोपडपट्टीत राहणाऱ्या दिलीप मोरे या मद्यधुंद इसमाने सुरक्षारक्षकांची नजर चुकवून चढण्यास सुरुवात केली. कुणाच्याही लक्षात येण्यापूर्वीच तो दारुच्या नशेत भराभर मनोऱ्याचा शिखरावर जाऊन पोहोचला. त्याचा हा पराक्रम पाहून आजूबाजूचे नागरिक धास्तावून गेले आणि त्याला खाली उतरवण्यासाठी सर्वांची एकच तारांबळ उडाली. ('नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता' छगन भुजबळांचा इशारा) दूरसंचारच्या कर्मचाऱ्यांनी खाली उतरविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु मनोऱ्याची उंची खूप असल्याने सर्वांचा नाईलाज झाला. या घटनेची माहिती संबंधितांनी निफाड पोलिसांना दिली. तसेच मद्यपीच्या बचावासाठी अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले. परंतु हे महाशय दारुच्या नशेत असल्याने कुणालाही जुमानायला तयार नव्हते. दूरसंचारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस यंत्रणा आणि अग्निशामक दलाच्या जवानांची देखील या प्रकारामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तब्बल चार तासांपर्यंत या मद्यधुंद इसमाला मनोऱ्यावरुन खाली उतरवण्यासाठी प्रयास सुरु होते. दुपारी बारा वाजता सुरु झालेला हा गोंधळ सुमारे चार तास सुरु होता. शेवटी चार तासानंतर त्याची नशा उतरल्यावर महाराज खाली आले आणि सर्वांनी सुटकेचा एकच निश्वास सोडला.

    तुमच्या शहरातून (नाशिक)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या