Home /News /nashik /

राज ठाकरेंचा अल्टिमेटम, मालेगावच्या मौलानांचा मशिदीवरील भोंगे काढण्यास नकार, वाद पेटण्याची शक्यता

राज ठाकरेंचा अल्टिमेटम, मालेगावच्या मौलानांचा मशिदीवरील भोंगे काढण्यास नकार, वाद पेटण्याची शक्यता

राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला मानण्यास मालेगावच्या मौलानांनी नकार दिला आहे. ऑल इंडिया इमाम काउन्सलिंगने मशिदीवरील भोंगे काढण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

नाशिक, 14 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मात्र या अल्टिमेटमला मानण्यास मालेगावच्या मौलानांनी नकार दिला आहे. ऑल इंडिया इमाम काउन्सलिंगने मशिदीवरील भोंगे काढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अजान नमाजसाठी भोंगे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज ठाकरे हा वाद वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "अजान हा नमाजचाच एक अविभाज्य घटक आहे. त्याला वेगळं करता येणार नाही. त्यामुळे अजान होतच राहणार. राज ठाकरेंच्या भूमिकेला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. माईक आणि भोंगे मशिदीवरच राहतील. त्यांना कुणीही बाहेर काढू शकणार नाही", अशी भूमिका मौलानांनी घेतली आहे. "राज ठाकरे सारखे लोक अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे दोन वेगवेगळ्या धर्माच्या नागरिकांमध्ये परस्परांप्रती द्वेष निर्माण होतो. तसेच सामाजिक वातावरण खराब होतं. अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, जेणेकरुन पुन्हा कुणी दुसरा व्यक्ती अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाही", अशी टीका मालेगावच्या मौलानांनी केली आहे. ('सिल्व्हर ओक'वरील हल्ल्याच्या दिवशी नेमकं काय घडलं? संदीप गोडबोले कोर्टात अखेर कबलला) राज ठाकरेंनी जेव्हापासून भोंग्याबाबतचा अल्टिमेटम दिला आहे तेव्हापासून त्याचे पडसाद मालेगावात बघायला मिळत आहे. मालेगाव हे मशिदींचं शहर मानलं जातं. इथे शेकडो मशिदी आहेत आणि सर्वांवर भोंगे आहेत. राज ठाकरे यांनी जेव्हा अल्टिमेटम दिला तेव्हा मालेगावातील प्रमुख मौलानांनी तो अल्टिमेटम मानन्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने जितक्या डेसिबलमध्ये आवाज सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे तितक्या आवाजात आम्ही भोंगे सुरु ठेवतो. त्यामुळे राज ठाकरेंनी कितीही अल्टिमेटम दिला तरी आम्ही भोंगे काढणार नाहीत. ज्या मशिदींवर भोंगे आहेत तिथले भोंगे कायम राहतील, अशी मौलानांची भूमिका आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? मनसेची ठाण्यात दोन दिवसांपूर्वी सभा झाली होती. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याबाबतचा अल्टिमेटम दिला होता. "3 तारखेला ईद आहे, माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे. आम्हाला कोणतीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही. राज्याचे स्वास्थ बिघडवायचे नाही. आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मेपर्यंत सगळ्या मौलवींशी बोलून घ्या, त्यांना समजावून सांगा, भोंगे काढून घ्या, 3 मेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही", असं राज ठाकरे म्हणाले होते. पण त्यांच्या या अल्टिमेटमला मौलानांनी प्रतिसाद देण्यास नकार दिला आहे.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:Chetan Patil
First published:

Tags: MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या