नाशिक, 28 एप्रिल: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) निर्माण झाला आहे. ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकार विविध मार्गाने ऑक्सिजनची निर्मिती करत आहे तसेच इतर राज्यांतूनही ऑक्सिजन महाराष्ट्रात आणत आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) एक मोठं पाऊल उचललं आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर औद्योगिक वसाहतीतील (Sinnar MIDC) तब्बल 3 वर्षांपासून बंद पडलेल्या 2 ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टला अधिग्रहित करण्यात आलंय. यातील स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स या कंपनीतून ऑक्सिजन निर्मितीला,आज प्रत्यक्ष सुरुवात झाली. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हातून या प्लॅन्टमधील प्रत्यक्ष सुरुवात झाली.
महाराष्ट्रात निर्माण झालेला वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील बंद पडलेले ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट अधिग्रहित करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यातील 2 ऑक्सिजन प्लॅन्ट सरकारने अधिग्रहित केले आहेत. आता या प्लॅन्ट मधून दररोज 600 जंबो सिलेंडरचं वितरण होणार आहे.अश्या प्रकारे बंद पडलेला प्लॅन्ट पुनर्जीवित करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प मानला जातोय.
(राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; आज 63309 रुग्णांचे निदान तर मृतकांचा आकडा धडकी भरवणारा)
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं, नाशिक येथील स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स कंपनी वीज बिल न भरल्यामुळे बंद होती. राज्यभरातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी आपले आतोनात प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना हातभार म्हणून कंपनीला सशर्त तात्पुरते वीज कनेक्शन देत ऑक्सिजन निर्मिती करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र एका गंभीर परिस्थितीतून जात असताना, जनतेच्या एक एक श्वासाची किंमत आम्ही जाणतो. सध्याच्या घडीला ऑक्सिजन निर्मिती हे आपले प्राधान्य आहे. त्यामुळेच किचकट प्रक्रियेला अंतर देऊन हा निर्णय त्वरित घेण्यात आला आहे. स्वस्तिक कंपनीतून दररोज 600 ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Nashik, Oxygen supply