नाशिक, 23 जानेवारी: शुक्रवारी बिहारमधील नेपाळच्या सीमेलगत बिरपूर याठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण तीन जवानांचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. तर या घटनेत अन्य 10 जवान गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेत नाशिक येथील बोलठाण येथील रहिवासी असणाऱ्या एका जवानाला वीरमरण आलं आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच बोलठाण परिसरात शोककळा पसरली आहे. एवढ्या तरुण वयात अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमोल हिंमतराव पाटील असं मृत पावलेल्या जवानाचं नाव आहे. ते नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील रहिवासी होते. ते सध्या सशस्त्र सीमा दलाच्या बिहार नेपाळ येथील सुपौलच्या बिरपूर सीमेवर कार्यरत होते. दरम्यान शुक्रवारी सशस्त्र सीमा बलाच्या 45 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचं प्रशिक्षण सुरू होतं. यावेळी 11 केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दहा जवान गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा-नाशिकच्या जवानाला वीरमरण, मकरसंक्रांतीच्या दिवशी गावावर कोसळला दुखाचा डोंगर!
संबंधित जवानांना तातडीने बिरपूर येथील ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तर चार गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आलं आहे. संबंधित प्रशिक्षण मैदानावरील उच्चदाब प्रवाहाच्या तारा व खांब काढण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने वीज विभागाला अनेकदा पत्रं लिहिली होती. तरीही वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये तीन जवानांचा हकनाक मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिकच्या अमोल पाटील यांचा देखील समावेश आहे.
हेही वाचा-नाशिक: नगरपंचायतीचा निकाल येण्यापूर्वीच काँग्रेस उमेदवाराचा अपघाती मृत्यू
मृत अमोल यांची सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा दलात निवड झाली होती. अमोल हे अलीकडेच दिवाळीसाठी आपल्या गावी बोलठाण येथे सुट्टीवर आले होते. त्यांनी कन्यारत्न झाल्याचा गावात मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला होता. त्यानंतर ते आपल्या आईसह पत्नी आणि चिमुकलीला सोबत घेऊन गेले होते. पण शुक्रवारी घडलेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आलं आहे. ऐन तारुण्यात अशाप्रकारे शेवट झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.